लोकमत न्यूज नेटवर्क
गंगापूर : ढोरेगाव शिवारात शिवना नदीपात्राच्या पाण्यात मुंडके नसलेले धड काही दिवसांपूर्वी आढळून आले होते. या हत्याकांडाच्या तपासाला पोलीस महासंचालनालयातून राज्यातील सर्वोत्कृष्ट ९ तपासात स्थान देण्यात आले आहे. कोणताही पुरावा नसताना मृताची ओळख पटविण्यासह मारेकऱ्यांचा छडा लावून एका गुंतागुंतीच्या हत्याकांडाचा उलगडा केल्याबद्दल तत्कालीन पोलीस निरीक्षक व सध्या वाहतूक शाखेतील मच्छिंद्र सुरवशेसह त्यांच्या पथकातील सहकाऱ्यांना पोलीस महासंचालकांनी १० हजारांचा रोख पुरस्कार आणि प्रशस्तीपत्र दिले आहे.
मार्च २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या राज्यभरातल्या ८१ पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालकांच्या वतीने सर्वोत्कृष्ट तपासाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात औरंगाबाद परिक्षेत्रातील ढोरेगावच्या प्रकरणाचा एकमेव तपासाचा समावेश आहे. तपासात आरोपीपर्यंत पोहोचणारे हे मराठवाड्यातील एकमेव प्रकरण आहे. गंगापूर ठाण्याअंतर्गत २२ ऑगस्ट २०२० रोजी शीर नसलेल्या महिलेचे प्रेत ढोरेगाव परिसरातील शिवना नदीच्या पात्रात सापडले होते. मृताची ओळख पटविण्यासाठी महाराष्ट्रात हरवलेल्या सर्व महिलांची तपासणी करण्यात आली होती. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. पायातील जोडवे व पैंजण यांचा धागा पकडून व इतर यंत्रणेमार्फत मृत महिलेची ओळख पटवून गंगापूर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले होते. या कामगिरीबद्दल पोनि मच्छिंद्र सुरवशे, पोउनि अर्जुन चौधर, पोना गणेश खंडागळे, पोहेको कैलास निंभोरकर यांना पोलीस महासंचालकांच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या हस्ते दहा हजाराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
----- फोटो
030921\fb_img_1630669075739.jpg
गंगापूर : विशेष पोलीस महानिरीक्षक के एम एम प्रसन्ना यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट तपासाचा सन्मान स्वीकारतांना पोनि मच्छिंद्र सुरवाहे, पोउनि अर्जुन चौधर, कैलास निंभोरकर, गणेश खंडागळे