नांदेड : पंजाब राज्यातील मोगा येथे दरोड्यानंतर खून प्रकरणात फरार झालेल्या आरोपीने नांदेडात आश्रय घेतला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगीनाघाट भागातून या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी हा आरोपी वेष बदलून नांदेडात फिरत होता. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.
गुरुप्रितसिंघ ऊर्फ सोनू गुरमित सिंग रा. गुमटाळा, ता. अजनाला असे आरोपीचे नाव आहे. त्याने मोगा येथे दरोडा टाकला होता. त्यानंतर एकाचा खूनही केला होता. घटनेनंतर ताे पळून नांदेडात आला. या ठिकाणी गुरुद्वारा परिसरात वेष बदलून राहत होता. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना या आरोपीची माहिती मिळाली.
त्यानंतर पोनि. द्वारकादास चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली सपोनि पांडुरंग माने, पोउपनि जसवंत शाहू, सपोउपनि माधव केंद्रे, दीपक पवार, किरण बाबर, मारोती कोरे, मोतीराम पवार, गंगाधर घुगे यांच्या पथकाने नगीनाघाट परिसरात आरोपीचा शोध घेतला. वेष बदलून फिरत असलेल्या गुुरप्रितसिंघ याला ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील तपासासाठी पंजाबला नेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.