औरंगाबाद : सोबत दारू पीत असताना टेबलावर ठेवलेला मोबाईल चोरी केल्याने दोन मित्रांत झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला. योगेश साहेबराव आहेर असे मृताचे नाव आहे. आरोपी राजू शेकलाल लोखंडे यास गुन्हे शाखेच्या पथकाने शरणापूर येथून अटक केली. पडेगाव येथील चैतन्यनगरातील नाल्यात गुरुवारी (दि.१३) योगेशचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी छावणी ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, सहायक पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन बारीक निरीक्षण केले. मृत योगेशचा भाऊ गणेश याच्याकडून माहिती घेतली. त्यावरून १२ सप्टेंबरच्या रात्री कन्नड येथील राजू लोखंडे (४०) याच्या सोबत योगेश होता असे समजले. त्यानुसार गुन्हे शाखेने सायबर शाखेकडून त्याच्या मोबाईलची माहिती हस्तगत केली. राजू आणि योगेश यांचे संभाषणदेखील मिळाल्याने त्याचा बारीक अभ्यास केला. तेव्हा मारेकरी लोखंडे असल्याचा संशय आला. शरणापूर येथे आरोपी लोखंडे येणार असल्याची खबर मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपी राजू लोखंडे यास मंगळवारी ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे सावंत, सूर्यतळ, हवालदार संतोष सोनवणे, बापूराव बाविस्कर, लालखान पठाण, नंदलाल चव्हाण, योगेश गुप्ता, रितेश जाधव, विरेश बने, हिरासिंग राजपूत यांच्या पथकाने आरोपीस अटक केली.
दारू पिऊन तर्राट, हाणामारीत गेला जीवएकाच टेबलावर दारू पीत बसलेल्या दोघांत मोबाईल हरवल्याच्या कारणावरून भांडण झाले. भांडणात जोराचा धक्का लागल्याने योगेश बाजूला दुचाकीवर जाऊन पडला. त्यास उचलून पुन्हा हाणामारी केली. काही वेळाने तो बेशुद्ध पडला, हालचालही करीत नव्हता. त्यास नदीजवळ सोडून निघून गेल्याची व जिवे मारल्याची कबुली लोखंडे याने पोलिसाना दिली.