औरंगाबाद : क्षुल्लक कारणावरून भाजी विक्रेता शेख रफिक यांचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करणारे तिन्ही भाऊ अट्टल गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपींविरोधात मृताच्या मामेबहिणीने दिलेल्या तक्रारीवरून जिन्सी ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख इर्शाद शेख इब्राहिम, शेख एजाज आणि शेख इस्माईल (रा. कटकटगेट परिसर) अशी खून करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. शनिवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास बायजीपुरा येथील गल्ली नंबर १६ येथे ही घटना घडली होती. पोलीस उपनिरीक्षक एच.डी.पांचाळ यांनी सांगितले की, बायजीपुरा येथील रहिवासी शेख रफिक शनिवारी रात्री प्रार्थनेसाठी मशिदीतून जाऊन येतो आणि दूध घेऊन येतो, असे मामेबहिणीला सांगून घरातून बाहेर पडला. गल्ली नंबर १६ येथे शेख इर्शादला त्याचा धक्का लागला. त्यावेळी इर्शादचे भाऊ शेख एजाज आणि शेख इस्माईल हे सुद्धा त्याच्यासोबत होते. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या तीन भावांनी रफिक यांना शिवीगाळ केली. रफिक यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. रफिक घटनास्थळी क ोसळले. कोणी तरी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना रात्री १०.२० वाजेच्या सुमारास रफिक यांचा मृत्यू झाला. रफिकवर इर्शाद आणि त्याच्या भावांनी हल्ला केल्याचे वृत्त कळताच परिसरातील दुकाने बंद झाली होती. मृताची मामेबहीण शेख मुन्नाबी यांच्या तक्रारीवरून शेख इर्शाद, शेख एजाज आणि शेख इस्माईल विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक पांचाळ यांनी दिली. आरोपींची प्रचंड दहशत इर्शाद, एजाज आणि इस्माईल यांची बायजीपुरा, संजयनगर, जिन्सी, कटकटगेट आणि आझाद चौक परिसरात प्रचंड दहशत आहे. त्यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न, चाकूहल्ला, शस्त्र बाळगणे, सामान्यांना धमकावून लुटणे अशा गंभीर स्वरूपाच्या तक्रारी पोलिसांकडे आहेत. इर्शाद याच्या गुन्हेगारी कारवायांनाआळा घालण्यासाठी पोलीस उपायुक्तांनी त्यास तडीपार केले होते. त्याच्या तडीपारीची मुदत संपलेली आहे. आरोपींना पकडण्यासाठी चार पथके जिन्सी पोलीस ठाण्यातील डी. बी. पथकासह गुन्हे शाखेची ४ वेगवेगळी पथके आरोपींना पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत आरोपी पोलिसांच्या हाती लागले नव्हते.
भाजी विक्रेत्याची हत्या; तीन भाऊ गुन्हेगार
By admin | Published: June 05, 2016 11:42 PM