औरंगाबाद : आपसातील वादातून पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर दोन जणांनी धारदार चाकूने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री साडेसहा ते अकरा वाजेच्या सुमारास जवाहर कॉलनी परिसरातील विष्णूनगरातील रस्त्यावर घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.
गणेश बोर्डे (२७) आणि विकी नगरकर (१९, दोघे रा. अरिहंतनगर), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. विजय सुभाष बिरारे (२४, रा. विष्णूनगर), असे जखमीचे नाव आहे. विजय घाटी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, जखमी विजय हा जवाहरनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तीन वर्षांपूर्वी त्याला तडीपार करण्यात आले होते. तेव्हापासून त्याच्यावर एकही गुन्हा नोंद नाही. १७ मे रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास विजय हा त्यांच्या घरातून सिगारेट पित विष्णूनगर येथील कॉर्नरवर आला. यावेळी तेथे त्याचा मित्र विकी नगरकर आणि गणेश बोर्डे हे एका स्टुडिओच्या ओट्यावर बसलेले होते. यावेळी बोर्डेने अचानक विजयला शिव्या देण्यास सुरुवात केली. विजयने शिवीगाळ का करतोस असे विचारताच बोर्डे आणि नगरकर त्याच्या अंगावर धाऊन आले आणि मारहाण करू लागले. बोर्डेने कमरेचा चाकू काढून विजयच्या छातीवर, बरगडीत, पाठीवर, नाकावर सपासप वार करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन विजय खाली कोसळताच आरोपी तेथून पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाइकांनी विजयला खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथून अधिक उपचारासाठी त्याला घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. विजयची अवस्था गंभीर आहे. याप्रकरणी मंगळवारी रात्री जवाहरनगर पोलिसांनी जखमी विजयचा जबाब नोंदवून आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आणि त्यांना अटक केली.
चौकट
प्रेम प्रकरणातून हल्ला झाल्याची चर्चा
सूत्राने सांगितले की, आरोपी आणि विजय हे मित्र आहेत. विजयच्या प्रेयसीसोबत आरोपींनी जवळीक वाढविल्याचे त्याला खटकले होते. यातून त्यांच्यात आपसात वाद सुरू होता. यातूनच काल रात्री हा हल्ला झाला.