- रुचिका पालोदकर
औरंगाबाद : २००० वर्षांपूर्वी भरतमुनींनी नाट्यशास्त्रात भारतीय अभिजात संगीतातील २२ श्रुतींबाबत लिहून ठेवले आहे. या श्रुती मानवनिर्मित नसून त्या नैसर्गिक आहेत. विद्येची देवता असणाऱ्या सरस्वतीची प्रतिमा चतुर्भुज असून तिने दोन हातात वीणा धरलेली आहे. एका हातात मोत्याची माळ तर दुसऱ्या हातात एक ग्रंथ आहे. यावरून संगीत हे आध्यात्मिक असून सात सूर हे परमेश्वराचीच देण आहे, असा संकेत मिळतो, अशी माहिती सुप्रसिद्ध हार्मोनियमवादक डॉ. विवेक बनसोड यांनी दिली.
शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयातर्फे शनिवारी ‘संवादिनी वादन तंत्र’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. अनेक श्रेष्ठ गायक ांना साथसंगत करणारे आणि पाईप हार्मोनियम या वाद्याला नवे स्वरूप देणारे उज्जैन येथील कलाकार डॉ. बनसोड यानिमित्त शहरात आले असताना त्यांनी ‘लोकमत’ला दिलेली ही विशेष मुलाखत.
प्रश्न : अभियंता असूनही हार्मोनियम या वाद्याकडे आपण कसे वळलात?उत्तर : लहानपणापासूनच हार्मोनियम या वाद्याची मला आवड होती. त्यामुळे अगदी बालवयातच या वाद्याचे शास्त्रीय शिक्षण घेणे मी सुरू केले. शिक्षण कोणत्याही क्षेत्रात असले तरी शेवटी हार्मोनियम वादन हे माझे पहिले प्रेम आहे. या वाद्याने मला नेहमीच आनंद दिला आहे.
प्रश्न : हार्मोनियम वादनात अनेक मर्यादा येतात, असे का?उत्तर : भारतीय संगीतात २२ श्रुती सांगितल्या आहेत. सितार, वीणा या पारंपरिक तंतू वाद्यातून हे सूर उमटले जातात. पण हार्मोनियम हे पाश्चात्त्य वाद्य असल्यामुळे त्यामध्ये केवळ १२ स्वरच लागतात. त्यामुळे हार्मोनियमला स्वरांची मर्यादा येते. म्हणून पूर्वी आपल्याकडील श्रेष्ठ गायक अनेकदा त्यांच्या मैफलीत हार्मोनियम साथीला घेत नसत. याच कारणामुळे भारतात जवळपास ३१ वर्षे हार्मोनियमवर बंदी घालण्यात आली होती. यानंतर ही बंदी उठविली गेली आणि हार्मोनियम वादन पुन्हा सुरू झाले.
प्रश्न : २२ श्रुतींच्या हार्मोनियमची निर्मिती आता झाली आहे. त्याविषयी काय सांगाल?उत्तर : केवळ १२ स्वरांमुळे हार्मोनियम वादनावर अनेक मर्यादा होत्या. त्यामुळे माझे गुरू डॉ. विद्याधर ओक यांनी यावर अभ्यास करून भारतीय संगीतातील २२ श्रुती या वाद्यात आणण्याचा प्रयत्न केला. हा प्रयोग सफल झाला आणि २००५ साली त्यांनी अशी हार्मोनियम तयार केली. ही हार्मोनियम गायन क्षेत्रातील दिग्गजांकडून आता मोठ्या प्रमाणावर स्वीकारली गेली आहे.
प्रश्न : पाईप हार्मोनियम वादक म्हणूनही तुम्ही ओळखले जाता, याविषयी सांगा?उत्तर : हार्मोनियमसारखेच हे वाद्यही विदेशी आहे. हे वाद्यही १२ सुरांचे असून हार्मोनियम आणि पाईप हार्मोनियम वाजविण्याच्या पद्धती मात्र पूर्णपणे भिन्न आहेत. हार्मोनियम ही भाता देऊन तर पाईप हार्मोनियम ही बासरीप्रमाणे फुंकर मारून वाजविण्यात येते.
प्रश्न : पाईप हार्मोनियममध्ये तुम्ही कोणते बदल केले आहेत?उत्तर : पाईप हार्मोनियमला मी एक मंगलवाद्य म्हणून ओळख दिली आहे. गंधार ट्युनिंग या प्रकारात त्याला ट्युन करून भारतीय शास्त्रीय संगीताला उपयुक्त ठरतील अशा श्रुती या वाद्यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रश्न : संवादिनी वादन तंत्र ही कार्यशाळा घेण्याची गरज का वाटते?उत्तर : आज शास्त्रीय संगीत शिकणारे विद्यार्थी २२ श्रुतींबद्दल खूप कमी जाणतात. बहुतांश संगीत विद्यालयांमधून १२ स्वरांच्या हार्मोनियमवरच संगीत शिकविले जाते आणि हे शिक्षण खूप अशुद्ध आणि अपूर्ण आहे. त्यामुळे खरे भारतीय शास्त्रीय संगीत मुलांना कळावे, श्रुतींचे ज्ञान त्यांना व्हावे, यासाठी संवादिनी वादन तंत्र मुलांना कळणे खूप गरजेचे आहे.
अवघे शरीरच गात्र वीणाभारतीय शास्त्रीय संगीतातील सप्त सूर हे निसर्गाच्या कणाकणात आहेत. आपल्या शरीरात ७ मूलाधार चक्र असतात आणि संगीतातील सप्त सूर हे एकेका मूलाधार चक्रातून उत्पन्न होतात. गायन करणारा माणूस सूक्ष्म निरीक्षण केले तर कोणता सूर कोणत्या चक्रातून उत्पन्न होत आहे, याची अनुभूती घेऊ शकतो, त्यामुळे आपले अवघे शरीरच एक गात्र वीणा आहे.
भरतमुनींनी भारतीय अभिजात संगीतातील २२ श्रुतींबाबत लिहून ठेवले आहे. या श्रुती मानवनिर्मित नसून त्या नैसर्गिक आहेत. - डॉ. विवेक बनसोड