औरंगाबाद: बीड बायपासवरील लॉन्सवर लग्नसमारंभ आटोपून घरी परतणाऱ्या बॅण्डपथकातील वाद्यवादक पादचाऱ्यास अज्ञात वाहनाने चिरडून ठार केले. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता वाहनासह पळून गेला. हा अपघात गुरूवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास बीड बायपासवर घडला.
मोहम्मद जमील मोहम्मद मन्सुरी (वय ५०,रा. बारुदगरनाला, जुनाबाजार)असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याविषयी पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, मोहम्मद जमील हे शहरातील बॅण्ड पथकात वाद्य वाजविण्याचे काम करायचे. गुरूवारी रात्री बायपासवरील एका मंगलकार्यालयात विवाहसमारंभप्रसंगी वाद्य वाजवण्याचा कार्यक्रम आटोपून सर्वजण देवळाई चौकातील रिक्षास्टॅण्डकडे जात होते. त्यावेळी देवळाईचौकाकडून झाल्टा फाट्याकडे जाणाऱ्या एका अनोळखी वाहनचालकाने अन्य वाहनांना ओव्हरटेक करण्यासाठी वेगात डाव्या बाजूने त्याचे वाहन पळविले. यावेळी फुटपाथवरून जाणाऱ्या चारी जमील यांना जोराची धडक दिली. या अपघातात जमील यांच्या दोन्ही पायावरून वाहनाचे चाक गेले आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते घटनास्थळीच ठार झाले.
या अपघातानंतर जमील यांना उडविणाऱ्या वाहनचा चालक घटनास्थळी न थांबता वाहनासह तेथून सुसाट पळून गेला. हा अपघात घडताच जमील यांच्या सहका-यांनी त्यांना तातडीने घाटी रुग्णायलात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता, अपघात विभागातील डॉक्टरांनी जमील यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जमील यांना उडविणा-या वाहनाचा शोध पोलीस घेत आहे.