श्रीकांत पोफळे/शेंद्रा : औरंगाबाद तालुक्यातील कवडगाव (अंबड) व कवडगाव (जालना ) अशा दोन्ही गावांतील मुस्लिमबांधवांनी गावच्या शिवेवर शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस नमाज अदाकरून पावसासाठी दुवा मागितली. रविवारी या उपक्रमाचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी हिंदु बांधवांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली व वारकरी संप्रदायाच्या मंडळीने दिंडी काढून पावसासाठी देवाला साकडे घातले.
औरंगाबाद जिल्हा तीन वर्षांपासून सतत दुष्काळाच्या छायेत असल्याने पशुधनाला लागणारे पिण्याचे पाणी सुद्धा विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यामुळे सर्वत्रच आता आपापल्या कुलदैवतांना नागरिक प्रार्थना करताना दिसत आहेत.
त्याची प्रचीती शुक्रवारी आषाडी एकादशीनिमित्ताने आली. जिल्ह्यात पावसासाठी औरंगाबाद तालुक्यातील दोन्ही कवडगावातील मुस्लिम बांधवांनी गावच्या शिवावर तीन दिवस नमाज अदा करण्याचा निर्णय घेतला. नमाज अदा रविवार हा शेवटचा दिवस होता.
त्यावेळी गावातील बालगोपाळ, तरुण व महिलांनी गावच्या शिवपर्यंत दिंडी काढली व पावसासाठी देवाला साकडे घातले. या निमित्ताने सामाजिक एकतेचा संदेश जिल्ह्यात देण्यात आला आहे.