औरंगाबाद : येत्या २७ जानेवारी रोजी शाहीनबागच्या धर्तीवर मुस्लिम समाज किसानबाग आंदोलन करून कृषी कायद्यांच्या निषेधार्थ सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देणार आहे. यादिवशी मुस्लिम समाज तालुका, जिल्हा व शहर पातळीवर संविधानाची प्रत हातात घेऊन दिवसभर धरणे आंदोलन करेल, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
या आंदोलनामुळे आरएसएस-भाजपच्या जातीयवादी राजकारणाला शह मिळेल व समूहाच्या प्रश्नांना महत्त्व देणारे राजकारण सुरू होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, मुंबईत आंबेडकर भवनात झालेल्या मुस्लिम अलीम, मौलाना व विचारवंतांच्या बैठकीत किसानबाग आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सीएए-एनआरसी विरोधी आंदोलनाच्या वेळी केंद्र सरकारने सत्तेचा दुरुपयोग करीत दिल्लीतील शाहीनबाग आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पंजाबच्या शेतकऱ्यांनी शाहीनबागेत येऊन लंगर व आंदोलकांच्या समर्थनाचे औदार्य दाखविले होते. आता पंजाबमधील शेतकऱ्यांशी एकरूपता व सहानुभूती दाखवत मुस्लिम समाजाने किसानबाग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात मुस्लिम समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या आंदोलनात काँग्रेस व डावे पक्ष दिसत नाहीत. त्यांना काय लकवा मारलाय का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
रामदास आठवले म्हणतात, तुम्ही रिपब्लिकन राहिले नाही. जोगेंद्र कवाडे म्हणतात, तुमचा पक्ष संधीसाधू लोकांचा ठिसूळ पक्ष आहे. याकडे लक्ष वेधले असता बाळासाहेब उत्तरले, त्यांना काय वाटते ते वाटू द्या. आम्ही कुणाच्या दारात कटोरा घेऊन तर उभे नाही. याचा आम्हाला अभिमान आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आम्ही पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर लढू, असे त्यांनी जाहीर केले. फारुख अहमद, सिद्धार्थ मोकळे, अमित भुईगळ, प्रभाकर बकले, योगेश बन, संदीप शिरसाठ, लता बामणे, वंदना नरवडे, कांचन सदाशिवे, माणिक करवंजे, आदींसह मुस्लिम व शीख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.