लोकमत न्यूज नेटवर्कऔैरंगाबाद : अंगाची लाहीलाही करणारा पारा वाढलेला असतानाही मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात शुक्रवारी दुपारी ‘शरियत’मध्ये होत असलेल्या हस्तक्षेपाच्या विरोधात मुस्लिम महिलांनी विराट मोर्चा काढला. ‘तीन तलाक’ तर एक निमित्त असून, ‘शरियत’मध्ये हस्तक्षेप करण्याचा हा बहाणा असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सूचनेनुसार प्रत्येक जिल्ह्यात महिला मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी विशेष नमाजनंतर आमखास मैदानावरून या मोर्चाला सुरुवात झाली. लहान लहान मुलांसह हजारोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. उन्हाची तमा न बाळगता महिला पायी थेट विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचल्या. यावेळी महिलांच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदनही केंद्र शासनाला सादर केले. तीन तलाक बिल त्वरित परत घेण्यात यावे, मुस्लिम महिलांच्या संदर्भात राष्टÑपतींनी केलेल्या विधानाचा निषेधही निवेदनात करण्यात आला. मोर्चातील सहभागी महिलांसाठी ठिकठिकाणी थंड पाणी, सरबतची व्यवस्था करण्यात आली होती. मोर्चात सहभागी होण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागात रिक्षा, बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी दोन वाजेपासूनच आमखास मैदानावर महिलांनी अलोट गर्दी केली. एका मंडपात महिलांना थांबण्यासाठी व्यवस्था केली होती. मोर्चाचे नेतृत्व फहीम-उन्न-निसा बेगम, खालिदा अमतुल अजीज, शाकिरा खानम, शायस्ता कादरी, मेहरुक फातिमा, तहसीन फातिमा, मुबश्शरा फिरदौस, शबाना आइमी, सायरा अजमल, फिरदौस फातिमा, शबीना बानो, कमल सुलताना, नसरीन बेगम, डॉ. शाजिया, डॉ. नुजहत तरन्नूम यांनी केले.मोर्चाला जमियत-ए-उलेमा, जमात-ए-इस्लामी हिंद, वहदते-ए-इस्लामी हिंद, रजा अकादमी, तामीर-ए-मिल्लत, अल्तमश ग्रुप आदी संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता.महिलांचा हल्लाबोलमोर्चाच्या समारोपप्रसंगी छोटेखानी सभा दिल्लीगेट येथील मैदानावर घेण्यात आली. यावेळी वहदत-ए-इस्लामी हिंदच्या शबाना आइमी यांनी नमूद केले की, महिलांना १४०० वर्षांपूर्वी सर्व अधिकार इस्लामने दिले आहेत. महिलांना चिंता करण्याची अजिबात गरज नाही.फिरदौस फातेमा यांनीही तीन तलाकच्या मुद्यावर केंद्र शासनावर जोरदार ताशेरे ओढत संविधानाने सर्व जाती-धर्मांना आपल्या रीती, प्रथा जपण्याचा अधिकार दिला आहे. केंद्राला महिलांची एवढी चिंता आहे तर अगोदर नजीबच्या आईला न्याय द्यावा.पहलू खानच्या पत्नीला, जुनैदच्या आईला न्याय द्यावा. जमात-ए-इस्लामीच्या शाईस्ता फातेमा यांनी नमूद केले की, आम्ही संविधानाला मानणारे आहोत. या देशात तानाशाही अजिबात चालणार नाही. काल पण येथे लोकशाही नांदत होती, पुढेही नांदत राहील. मुबश्शरा फिरदौस यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.