छत्रपती संभाजीनगर : शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या प्राध्यापिका वैशाली देशमुख (वय ४८, रा. पदमपुरा) यांच्या नावे अज्ञातांनी परस्पर १ लाख ९० हजारांचे कर्ज काढून रक्कम काढून घेतली. पोलिस व बँकेकडे तक्रार करून त्यांनी व्याजाची कपात बंद केली. त्यानंतर पेटीएमच्या एजंटांनी मात्र घरी जाऊन धमक्या देणे सुरू केले. देशमुख यांनी याप्रकरणी पुन्हा तक्रार केल्यानंतर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सप्टेंबर, २०२२ मध्ये त्यांना त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्याचे विवरण तपासताना १० हजार ४७५ रुपयांची हप्त्याची रक्कम कमी झाल्याचे आढळले. त्यांनी तत्काळ बँकेशी संपर्क केला असता २३ जुलै, २०२२ रोजी त्यांच्या खात्यात १ लाख ९० हजार रुपये जमा होऊन त्याच दिवशी तीन टप्प्यात ती रक्कम काढून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु, देशमुख यांनी असा कुठलाच व्यवहार केला नव्हता. त्यांनी याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार केली. तेव्हा बँकेने त्यांच्या टॅबवर पेटीएम खाते उघडून आदित्य बिर्ला फायनान्स कंपनीकडून दोन लाखांचे वैयक्तिक कर्ज घेतल्याचे स्पष्टीकरण दिले. परंतु, देशमुख यांचा संबंधच नसल्याने त्यांनी हप्ता बंद केला.
मग धमक्या सुरू झाल्याया सर्व प्रकारानंतर पेटीएमचा एजंट देशमुख यांच्या घरी जाऊ लागले. कर्ज फेडण्यासाठी अश्लील धमक्यांचे मेसेज करू लागले. ज्या मोबाईल क्रमांकावरून कर्जाचा व्यवहार झाला त्या क्रमांकाशीदेखील देशमुख यांचा संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, तरीही त्यांना ९ सप्टेंबर २०२३ रोजी अचानक पेटीएमकडून जयपूर लोकअदालत मार्फत सेटलमेंट लेटर पाठविण्यात आले. देशमुख यांनी पुन्हा पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निरीक्षक ब्रम्हा गिरी याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.