औरंगाबाद : शहरातील विविध प्रश्नांवर काम करण्यासाठी, तसेच हे प्रश्न सोडविण्यामध्ये नागरिकांचा सहभाग असावा या दृष्टीने ‘मराठवाडा एन्व्हायर्नमेंटल केअर क्लस्टर’ याअंतर्गत ‘औरंगाबाद फर्स्ट’ ही संस्था काही वर्षांपासून काम करीत असून, आगामी काळात नव्याने रस्ते, वृक्षारोपण, सार्वजनिक स्वच्छतागृहे, स्वच्छ आणि हरित औरंगाबाद, वाहतूक शिस्त आणि सुरक्षा, महापालिकेच्या खुल्या जागा या मुद्यांवर ही संस्था काम करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष उद्योजक मानसिंग पवार यांनी बुधवारी दिली.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला भेट दिली. यावेळी झालेल्या चर्चेत मानसिंग पवार यांनी सांगितले की, मागील पाच वर्षांपासून ‘औरंगाबाद फर्स्ट’ ही संस्था कार्यरत आहे. संस्थेने काही प्रकल्पही मार्गी लावले आहेत. वाळूज औद्योगिक वसाहतीत वृक्षारोपण, औद्योगिक वसाहतींमध्ये स्वच्छता अभियान, मलनिस्सारण प्रकल्प आदी प्रकल्प राबविले आहेत. औरंगाबाद शहरातील विविध प्रश्नांवर नागरिकांचा एक दबाव गट स्थापन व्हावा या हेतूने आणि हे प्रश्न सोडविण्यामध्ये नागरिकांचा सहभागही असावा. नागरिकांच्या सहभागातून आपलेच प्रश्न सोडविण्यासाठी एक व्यापक चळवळ उभी राहावी, हा यामागचा हेतू आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांच्या मागण्यांची सनदही देण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्याबरोबर नागरिकांची जबाबदारी काय असते, याचीही सनद आम्ही मांडणार आहोत. शहरातील वाहतुकीच्या मुद्यावर आम्ही जगजागृतीपर कार्यक्रम घेणार आहोत. शहरात सुमारे ३७ हजार रिक्षाचालक आहेत. येत्या काही दिवसांत रिक्षाचालकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहितीही मानसिंग पवार यांनी दिली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र कोंडेकर, कोषाध्यक्ष अनिल माळी, रमेश नागपाल, विवेक भोसले, समन्वयक हेमंत लांडगे, निखिल भालेराव, अभिजित हिरप उपस्थित होते.
आमच्यासोबत विविध क्षेत्रांतील लोकयावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष राम भोगले म्हणाले की, समाजाच्या सर्व लोकांनी एकत्र येऊन काही केले तर खूप काही होऊ शकते. यादृष्टीने आम्ही सगळे प्रयत्न करीत आहोत. आमच्यासोबत डॉक्टर, वकील, प्राध्यापक आदी मंडळी आहेत. यापूर्वी आम्ही स्वच्छता, वृक्षारोपण आदी कार्यक्रम घेतले आहेत. नव्याने शहरासमोरील काही समस्यांबाबत काम करणार आहोत.
टॉप शहरांमध्ये समावेश व्हावायावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष रिषी बागला म्हणाले की, औरंगाबाद शहर सध्या देशात २०० व्या क्रमांकापेक्षाही खाली आहे. इंदूर, सुरत ही शहरे पूर्वी औरंगाबादपेक्षाही अस्वच्छ होती. आता ती देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत अग्रक्रमावर आहेत. औरंगाबाद शहराचादेखील २०२५ पर्यंत देशातील प्रमुख शहरांमध्ये समावेश व्हावा, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी औरंगाबाद फर्स्ट ही संस्था काम करणार आहे. या शहरात बाहेरून खूप लोक आले. त्यांना या शहराने खूप काही दिले. आपलेही या शहरासाठी काही देणे लागते या भावनेतून या शहराला एका उंचीवर नेण्याची गरज आहे. माझ्याआधी माझे शहर म्हणजे ‘औरंगाबाद फर्स्ट’ अशी संकल्पना आहे.
या मुद्यांवर संस्था करणार काम- शहरातील पार्किंगची समस्या- बीओटीवरील प्रकल्प- रस्ते सुशोभीकरण- सार्वजनिक शौचालये- पाण्याचे नियोजन- स्मार्ट वॉर्ड, स्मार्ट नगरसेवक- मनपा शाळांचे सामाजिक लेखापरीक्षण- याशिवाय पर्यावरण, पाणी, रेल्वे आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासंबंधी माहितीचे संकलन केले जाणार आहे.