फिरोज खान
औरंगाबाद : तुम्ही माझ्या वडीलांच्याच वयाचे आहात आणि त्यांच्यासारखेच दिसत आहात. आजच माझे वडील कोरोनाने गेले. तुम्ही मात्र काळजी घ्या. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नियम पाळा, अशी पोलीस कन्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभ्या असलेल्या वाहतूक पोलीस शाखेच्या सहायक फौजदाराला केलेली आर्त विनवणी त्या पोलीसांचे आणि उपस्थितांचेही हृदय पिळवटून टाकणारी ठरली.
पुण्याच्या चतुशृंगी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार विलास सरवदे यांचे गुरूवारी वयाच्या ५५ व्या वर्षी कोरोनामुळे उपचारादरम्यान पुण्यात निधन झाले. भुसावळ येथे राहणारी त्यांची कन्या शिल्पा आणि जावई हे सरवदे यांच्या अंत्यसंस्कारासाठी औरंगाबादमार्गे पुणे येथे जात होते. दिल्लीगेटच्या पुढे त्यांच्या खाजगी वाहनातून जात असताना शिल्पा यांना अण्णाभाऊ साठे चौकात त्यांच्या वडिलांच्या वयाचे पोलीस कर्मचारी उभे दिसले.
त्यांना पाहून शिल्पा यांनी कार थांबवली. गाडीतून उतरून शिल्पा थेट सहायक फौजदार एस. जे. निकाळजे यांच्याजवळ गेल्या. माझ्या वडिलांचे कोरोनाने आज निधन झाले. तुम्ही त्यांच्याच वयाचे दिसता, काळजी घ्या, मास्क वापरा, सोशल डिस्टंसिंग पाळा, अशी आर्त विनवणी त्यांनी दाटल्या कंठाने केली. एक तरूणी आपल्याला काळजी घेण्याची विनंती करीत असल्याचे पाहून निकाळजे यांनाही भरून आले. आपल्याच खात्यातील कोरोनायोद्ध्याची मुलगी तिच्यावर ओढवलेल्या कठीण वेळेतही पोलिसांविषयी आणि पोलीस खात्याविषयी सहानुभूती दाखवत असलयाचा प्रसंग उपस्थितांना गलबलून टाकणारा होता.