औरंगाबाद : इंग्रजीच्या मोहमायेत आज प्रत्येकजण गुरफटून गेला आहे. बहुतेकांचे इंग्रजीच्या प्रेमात गुंतणे इतके विलक्षण आहे की, तिच्यापुढे माय मराठी फिकी वाटू लागली आहे. पण आता मात्र इंटरनेटचे बोट धरून आणि जागतिकीकरणाच्या वाटेवर स्वार होऊन माय मराठीचे रूपडे वेगाने पालटू लागले आहे.
स्वत:सोबतच मराठी भाषेचा विकास साधत आजची तरुणाई आता खरोखरच माय मराठीसंगे गगनभरारी घेण्यास सज्ज झाली आहे. मराठी भाषेचे महत्त्व समजून घेऊन सध्या तरी खूपच कमी लोक नव्या क्षेत्रातील नव्या संधी समजून घेत आहेत. पण हेही नसे थोडके, असे म्हणत मराठीच्या जाणकारांकडून याबाबत आजच्या मराठी भाषा गौरवदिनी समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आजची तरुण पिढी मराठीकडे पाठ फिरवतेय, असे वाटून तरुणाईच्या नावाने कायमच बोटे मोडली जातात. पण मराठीला जगाशी जोडू पाहण्याचा प्रयत्न हीच तरुणाई करते आहे, हे विशेष.
आज जागतिकीकरणामुळे विविध वेबसाईट, सोशल मीडिया, शॉपिंग साईट हे सगळे पर्याय प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध होत आहेत. जगात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या दहा भाषांमध्ये मराठी आहे. त्यामुळे साहजिकच या क्षेत्रातील मराठीच्या संधींचा विस्तार प्रचंड आहे. याशिवाय जागतिक स्तरावर नावाजल्या गेलेल्या विविध भाषांमधील साहित्य, चित्रपट, वेबसिरीज यांचा मराठीत होणारा अनुवाद आणि त्यातील आर्थिक उलाढाल डोळे दीपवणारी आहे. व्लॉग आणि ब्लॉगच्या साहाय्यानेही नवी पिढी मराठीतून जगाशी जोडली जाते आहे. मराठीची धुरा नव्या माध्यमातून स्वार होऊन नव्या पिढीच्या खांद्यावर स्थिरावू पाहते आहे, हेच यातून स्पष्ट होते.
वास्तववादी पुस्तके वाचण्याकडे तरुणाईचा कलपुस्तकांच्या दुनियेत वावरत असल्याने हे तर निश्चितच सांगू शकतो की, लोकांचे मराठी वाचन प्रचंड वाढलेले आहे. साहित्यिक पुस्तकांप्रमाणेच आजच्या जगाशी जुळविणारी वास्तववादी पुस्तके वाचण्याकडे तरुणाईचा कल आहे. एका हिंदी प्रकाशनाने पुस्तकांची एक शृंखला नुकतीच प्रसिद्ध केली आहे. ही सगळी पुस्तके पंचविशीच्या आसपासच्या तरुणाईने लिहिली असून पुस्तकांवर वाचकांच्या अक्षरश: उड्या पडत आहेत. आजच्या तरुणाईशी ‘कनेक्ट’ होणारी हिंदी या पुस्तकांमध्ये असल्याने ती लोकप्रिय ठरली, असे तज्ज्ञांचे मत आहे. असाच बदल जर मराठीत झाला, तर आजच्या तरुणाईची नाळ पुन्हा एकदा मायमराठीसोबत जोडली जाईल.- प्रणव कुलकर्णी, संपादक, अनुवादक