छत्रपती संभाजीनगर : आम्हाला नकली शिवसेना म्हणणाऱ्या गद्दारांना धडा शिकवा, असे आवाहन शुक्रवारी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील प्रचंड जाहीर सभेत केले. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि जालना लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार डाॅ. कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि मोदी सरकारवर सडकून टीका केली.
दुपारी शहरात झालेल्या अवकाळी पावसाने वातावरण बदलून गेले गेले होते. संध्याकाळीही पाऊस येतो की काय, अशी शंका असताना या सभेस चांगला प्रतिसाद मिळाला. संपूर्ण मैदान भरून गेले होते. तब्बल पंचेचाळीस मिनिटांच्या भाषणात ठाकरे यांनी भाजप नेत्यांवर व एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली. कधी मला तर कधी शरद पवार यांना डोळा मारतात, पण आम्ही त्यांच्या प्रेमात पडणार नसल्याची स्पष्ट ग्वाहीही ठाकरे यांनी उपस्थितांच्या टाळ्यांच्या कडकडाटात दिली. माझी शिवसेना फोडली, शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली, तरीही यांना माझी भीती वाटते, असा टोला त्यांनी मारला. मुस्लिमांची लोकसंख्या वाढली, हे तुमचं यश की अपयश, असा प्रश्न ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. पंतप्रधानांची भाषा महाराष्ट्र खपवून घेणारच नाही, असा इशारा त्यांनी दिला.
आता जरा आराम घ्या.जरा आराम घ्या. कपालभाती करा, डोक्याला पतंजलीचं तेल लावा, असा सल्ला देत ठाकरे यांनी तुमच्या विकासाच्या इंजिनला भ्रष्टाचाराची चाके असल्याचा टोला नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
खैरे उपस्थितांसमोर नतमस्तकचार वेळा खासदार असताना चंद्रकांत खैरे यांनी काय केले या प्रश्नाचे उत्तर अंबादास दानवे यांनी कामांची यादी वाचून दिले. तसेच मुख्यमंत्री असताना छत्रपती संभाजीनगर शहरासाठी काय काय केले हेही विस्ताराने सांगितले. संदीपान भुमरे यांच्या आवाजातील क्लीप दानवे यांनी ऐकवली. उद्धव साहेब सांगतील तर सहाव्या मजल्यावरून ही मी उडी मारेन, असं भुमरे म्हणाले होते. पैठणचं पार्सल पैठणला पाठवा, असे आवाहन अनिल पटेल यांनी करताच टाळ्या पडल्या. मनोगत व्यक्त करून मंचावरूनच चंद्रकांत खैरे उपस्थितांसमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद मागितले.
उद्धव ठाकरे यांनी केले संविधान पूजन सभा सुरू होण्यापूर्वी शाहीर सुरेश जाधव व संचाने पोवाडे गाऊन चैतन्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, माॅंसाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. स्वतः उद्धव ठाकरे यांनी संविधानाचे पूजन केले. या सभेत मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष रमेश गायकवाड, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार प्रा. किशोर पाटील, काॅंग्रेसचे माजी राज्यमंत्री अनिल पटेल व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भाषणे झाली. उद्धव ठाकरे मंचावर आल्यानंतर उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी मनोगत व्यक्त केले.