कंधार तालुक्यात काकांकडे चौथीला शिकत असताना शिष्यवृत्ती परीक्षेसोबतच ‘शासकीय विद्यानिकेतन’ प्रवेश परीक्षाही दिली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मराठवाड्यातील ३० मुलांमध्ये माझा १३ वा क्रमांक आला. त्यामुळे मला छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय विद्यानिकेतनमध्ये (गव्हर्नमेंट पब्लिक स्कूल) पाचवीला प्रवेश मिळाला. या निवासी शाळेत अतिशय दर्जेदार शिक्षण मिळाले. या ठिकाणी शिकत असतानाच मला सामाजिक भान आले आणि खऱ्या अर्थाने हाच माझ्या आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरला, अशी प्रांजळ कबुली ‘डीआरडीए’ चे प्रकल्प संचालक अशोक सिरसे यांनी दिली.
मजुरी करणाऱ्या कुटुंबात जन्म झालेला मी. आमची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. बिलोली तालुक्यात मला आजीने पहिलीला शाळेत घातले. त्यानंतर तिसरी आणि चौथीच्या शिक्षणासाठी मला काकांनी कंधारला नेले. तिथे शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेत गुणवत्तायादीत आलो आणि कधीही मोठे शहर न पाहिलेला मी छत्रपती संभाजीनगर शहरात या निवासी शाळेत दाखल झालो. या शाळेत शिक्षण, भोजन, ड्रेस, शालेय साहित्य, सुंदर लायब्ररी, खेळ अशी सर्व व्यवस्था उच्च दर्जाची होती. पुढे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. एक-दीड वर्षे खासगी कंपनीत नोकरी केल्यानंतर ‘एमएसईबी’मध्ये निर्मिती विभागात नोकरी मिळाली. तिथे साडेनऊ वर्षे नोकरी केली. परळी, नाशिक, भुसावळ येथे नोकरी केली व त्याचवेळी ‘एमपीएससी’विषयी माहिती मिळाली. ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ‘महाराष्ट्र विकास सेवा’ यासाठी माझी निवड झाली.
गटविकास अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर परभणी, रेणापूर, पाथ्री, यवतमाळ, हिंगोली, बीड येथे काम केले. त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पदोन्नती मिळाल्यामुळे जि.प. चंद्रपूर व छत्रपती संभाजीनगर येथे काम केले. येथे नोकरीवर असतानाच सन २०२० मध्ये मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे खासगी सचिव म्हणून जून २०२२ पर्यंत काम केले. त्यानंतर मुंबई येथे पर्यटन सहसंचालक पदावर काम केले. अलीकडे जुलै २०२३ पासून येथे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा येथे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत आहे. जर शिक्षणासाठी शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश मिळाला नसता, तर मला पुढील शिक्षण घेताही आले नसते. तिकडेच एखाद्या खेड्यात मी राहिलो असतो. समाजाशी आपले काही देणे असते, याची उतराई मला करता आली नसती.
( शब्दांकन : विजय सरवदे)