औरंगाबाद : वाढत्या रुग्णांना उपचार देताना बेड्स आणि मनुष्यबळाची अडचण भासणार आहे. त्यामुळे कोरोनाला आपण केवळ लसीकरणानेच रोखू शकतो, असे मत महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी बुधवारी व्यक्त केले. शासन निर्देशानुसार शहरात 'माझा वॉर्ड शंभर टक्के कोरोना लसीकरणयुक्त’ अभियान राबविण्याची घोषणा त्यांनी केली.
प्रशासकांनी बुधवारी दुपारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून शहरवासीयांशी संवाद साधला. त्यांनी औरंगाबाद शहरात कोरोनाला रोखण्यासाठी आता चाचण्यांसोबतच लसीकरणाची जम्बो मोहीम राबविणार असल्याचे स्पष्ट केले. १५ खासगी रुग्णालये, महापालिका, घाटी प्रशासन मिळून ३३ केंद्रांतून लसीकरण केले जात आहे. कोरोना रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर्स वाढविली जात आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी पालिकेकडून आता शहरात ‘माझा वॉर्ड शंभर टक्के लसीकरणयुक्त’ अभियान राबविले जाणार आहे. यासाठी शहरातील खासदार, आमदार, नगरसेवक या सर्व लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
लसीकरणासाठी अतिरिक्त दहा टीमलसीकरणासाठी अतिरिक्त दहा टीम कार्यरत करून ‘लसीकरण हॉस्पिटल आपल्या दारी’ ही मोहीम राबवली जाणार आहे. या टीम कंटेन्मेंट झोनमध्ये जाऊन लसीकरण करतील. प्रत्येक टीममध्ये दोन डॉक्टर्स, दोन नर्स, डाटा एंट्री ऑपरेटरसह आवश्यक स्टाफ असेल. शहरातून कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसेसवरही या टीमचे लक्ष राहील.
कामगार वर्गासाठी स्वतंत्र नियोजनशहरातील कामगार, कर्मचारी वर्गासाठी लसीकरणाचे वेगळे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक केंद्रावर सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत आणि सायंकाळी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत लसीकरणासाठी पालिकेची आरोग्य पथके तैनात राहतील.
शहरासाठी तीन लाख लसींचे लक्ष्यसरकारकडून शहरासाठी तीन लाख लसींचे डोस मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यांपैकी ५० हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आगामी तीन महिन्यांत तीन लाख जणांना लस देण्याचे लक्ष्य सरकारने शहराला दिले आहे.