औरंगाबाद : मालेगाव, दिग्रस आणि आता वरळी येथून विधानसभा निवडणुक लढण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, हे त्यांचे प्रेम आहे. जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने लोकांचे मत जाणून घेतल्यानंतर त्यांच्या आदेशाने विधानसभा लढण्याचे ठरवणार. लढायचे ठरल्यास संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे, कुठूनही लढेन असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सूचित केले.
आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात जनआशीर्वाद यात्रा सुरु होताच त्यांच्या विधानसभा लढण्यावर चर्चा सुरु झाली आहे. यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेकडून त्यांना मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून प्रोजेक्ट केले जात आहे. यामुळे ते कोणत्या मतदारसंघातून लढणार यांवर उत्सुकता आहे. सुरुवातीला मालेगाव, दिग्रस आणि आता वरळीमधून त्यांनी निवडणूक लढावी अशा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना कोणत्या मतदारसंघातून लढणार असा प्रश्न विचारला असता त्यांनी, निवडणूक लढण्याचे लोकांची मत जाणून घेतल्यास ठरवणार. प्रामुख्याने कर्मभूमीतून निवडणूक लढवली जाते मात्र संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी असून मी सगळीकडे सारखेच काम करेल असे उत्तर देत कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार या प्रश्नाला त्यांनी बगल दिली.