औरंगाबाद : गुलमंडीवरील नगारखाना गल्लीतील कुरिअर कंपनीचे व्यवस्थापक कमलेश पटेल यांचा मारेकरी आणि उद्योजक छाजेड कुटुंबावरील हल्ला कुणी केला याचा उलगडा पोलिसांना अद्याप करता आला नाही. सिडको एन-१ येथील नवीन सिंघवी व डॉ. कंधारकर यांचे घर फोडणारे चोरटे पोलिसांना शोधता आले नाहीत. शिवाय दौलताबाद परिसर आणि वाळूज परिसरातील दरोडा, बायपासवरील २५ लाखांच्या रकमेसह एटीएम मशीन उचलून नेणारेही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. यासह अनेक गंभीर गुन्ह्यांच्या फाईल पोलिसांनी कपाटात ठेवून दिल्या. पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता या फायली पुन्हा उघडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. असे असले तरी घरफोड्या आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी झालेल्या खुनाचा उलगडा पोलिसांना करता आलेला नाही. नगारखाना गल्लीत राहणारे कुरिअर कंपनीचे व्यवस्थापक कमलेश पटेल यांची जानेवारी महिन्यात दिवसाढवळ्या कार्यालयात घुसून गोळी झाडून हत्या झाली. चार मारेकऱ्यांनी हे कांड केले. अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत ते आणि त्यांची वाहने कैद झाली. पोलिसांचा तपास केवळ त्यांची रेखाचित्रे काढण्यापर्यंत सरकला.
उद्योजक छाजेड कुटुंबावर जानेवारी २०१९ मध्ये घरात घुसून प्राणघातक हल्ला झाला. या घटनेत आजोबा आणि त्यांचा १६ वर्षांचा नातू सुमारे महिनाभर रुग्णालयात होते. शहराला हादरवून टाकणाऱ्या या घटनेचा उलगडा पोलिसांना करता आला नाही.
चौकट
सीआयडीकडे खुनाच्या दोन घटनांचा तपास
चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ जानेवारी २०१७ रोजी सुंदरवाडी शिवारात अमोल साबळे या तरुणाचा रेल्वे रुळावर छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळला होता. या हत्येला पुढील महिन्यात ४ वर्षे होत आहेत. ग्रामीण पोलिसांना या गुन्ह्याचे कोडे सुटले नाही. यामुळे मृताच्या आई- वडिलांच्या मागणीवरून शासनाने हा गुन्हा सीआयडीकडे वर्ग केला. उल्कानगरीत मे २०१२ मध्ये श्रुती भागवत या शिक्षिकेची घरात घुसून हत्या झाली. या गुन्ह्याचा तपास सीआयडी करीत असून, त्यांनाही अद्याप यश आलेले नाही.
==================
जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनकर धनई यांचा मृतदेह आढळला होता. त्यांचाही खून झाल्याचा अदांज आहे. २०१७ मध्ये झालेल्या या घटनेला तीन वर्षे उलटून गेली. मात्र, तपास ‘जैसे थे’च आहे.