वाळूज महानगर (औरंगाबाद ) : बजाजनगरात पंधरवड्यापूर्वी दगडाने ठेचून धम्मपाल शांतवन साळवे (३०, रा.मालुंजा, ता.गंगापूर) याचा खून करण्यात आला होता. या खुनाचे रहस्य उलगडण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून, आरोपी राजेंद्र ऊर्फ कारभारी कान्हूजी मगरे व प्रशांत भानुदास साळवे (दोघेही रा. मसनतपूर परिसर) या दोघांना जेरबंद केले आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे तपासात उघड झाले.
वाळूज उद्योगनगरीतील शॉर्प इंडस्ट्रीजसमोर १५ एप्रिल रोजी हा खून करण्यात आला होता. खुनाचे गूढ शोधण्यासाठी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गायकवाड, डीबी पथक प्रमुख राहुल रोडे, पोना. शैलेंद्र अडियाल, पोहेकॉ. वसंत शेळके व पथकाचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. धम्मपाल साळवे या कामगार तरुणाच्या खुनाचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक विजय पवार, उपनिरीक्षक अमोल देशमुखदेखील प्रयत्नशील होते. शनिवारी गुप्त बातमीदाराने या खून प्रकरणात सहभागी आरोपीची माहिती निरीक्षक सावंत यांना दिली. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने मसनतपूर शिवारातील अशोकनगर, सिंदीबन येथे छापा मारून राजेंद्र ऊर्फ कारभारी कान्हूजी मगरे व प्रशांत भानुदास साळवे या दोघांना जेरबंद केले.
धम्मपालचा खून अनैतिक संबंधातून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. धम्पपालच्या पत्नीची आरोपी राजेंद्र मगरे याच्यासोबत मैत्री होती. या मैत्रीतून त्यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. घटनेच्या दिवशी राजेंद्र मगरे व प्रशांत साळवे यांनी बजाजनगरात येऊन धम्मपाल यास दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावून घेऊन त्याचा रात्री दगडाने ठेचून खून करून पसार झाले. या आरोपीचे मोबाईल लोकेशन घटनेच्या दिवशी बजाजनगरात येत असल्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावर संशय बळावला होता. ही कारवाई पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ.दीपाली घाटे-घाडगे, सहा.आयुक्त डॉ.नागनाथ कोडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय पवार, उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोहेकॉ.मच्छिंद्र ससाणे, पोना. किरण गावंडे, गोविंद पचरंडे, ओमप्रकाश बनकर, पोकॉ. दत्ता ढंगारे, विजय पिंपळे, रवींद्र दाभाडे, राहुल हिवराळे, चालक ज्ञानेश्वर पवार, मपोशि संजीवनी शिंदे यांनी ही कामगिरी बजावली.