हनुमान नगर ते पुढे एन-४ मध्ये नागरे यांच्या निवासस्थानापर्यंत सारस्वत बँकेच्या समोरून जाणाऱ्या सिमेंटच्या रस्त्याचे काम रखडलेले आहे. रस्त्याच्या मधोमध मोठमोठे सिमेंटचे पाईप टाकले आहेत. आजूबाजूला रस्ताही उकरून ठेवलेला आहे. त्यामुळे छोटे-मोठे अपघात हे नित्याचेच होऊन गेले आहेत. तीन महिन्यांपासून रखडलेले हे काम त्वरित पूर्ण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
परिसरात सध्या २०० हून अधिकच भटकी कुत्री रस्त्यावरून फिरताना दिसतात. रस्त्यांच्या कडेला ही कुत्री दबा धरून बसलेली असतात. सकाळी सकाळी पेपर वाटणाऱ्या मुलांच्या अंगावर धावून जातात. महिलांना, मुलांना चावा घेण्याचा नित्याचाच प्रकार झालेला आहे. या भटक्या कुत्र्यांची नसबंदी करून त्यांची वाढती संख्या कशी रोखता येईल, याकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे.
एन-४, सिडको परिसरात पाण्याची समस्या, तर खूप खूप गंभीर झालेली आहे.
कधी आठ, तर कधी नऊ दिवसांनी पाणी देण्याचा जणू अलिखित कार्यक्रमच निश्चित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर दूषित, गाळ व धूळमिश्रित पाणीही इकडे येते.
भुरट्या चोऱ्या वाढल्या
सिडको एन-४ परिसरात वाहनांमधील पेट्रोल चोरीचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील नागरिकांच्या फ्लॅटच्या खाली अगदी बंगल्यातील नळाला लावलेल्या विजेच्या मोटारी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. परिसरात पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.