औरंगाबाद : ‘लसीकरणासाठी या आणि कोरोना घरी घेऊन जा’, ही एन-८ येथील आरोग्यवर्धिनी केंद्रातील परिस्थिती अखेर दूर झाली आहे. येथील कोरोना चाचणी सेंटर बुधवारी युद्धपातळीवर एन-७ येथील मनपा शाळेत हलविण्यात आले. एन-८ येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात आता फक्त कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाणार आहे.
आरोग्यवर्धिनी केंद्रात अवघ्या २० पावलांच्या अंतरावर लसीकरण आणि कोरोना चाचणी या दोन्ही बाबी सुरू होत्या. लसीकरणासाठी आणि चाचणीसाठी येणाऱ्यांची एकत्रितपणे ये-जा हाेत होती. ‘लोकमत’ने या प्रकाराविषयी २४ मार्च रोजी ‘लसीकरणासाठी या अन् कोरोना घरी घेऊन जा’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताने खडबडून जागे झालेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारी येथील कोरोना चाचणी थांबविली. नागरिकांच्या सुविधेसाठी आता एन-७ येथील मनपा शाळेत कोरोना चाचणीचे सेंटर हलविण्यात आले. येथे एका फलकाद्वारे नागरिकांना माहिती देण्यात आली. येथील कोविड आरटीपीसीआर, अँटिजन टेस्टिंग सेंटर हे एन-७ येथील मनपाच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रप्रमुख डाॅ. बुशरा सिमी यांनी दिली. एन-८ येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात २४ तास लसीकरण सुरू असून, त्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. सचिन हाके यांनी सांगितले.
सर्वच केंद्रांना फायदा
जागेच्या अडचणीमुळे लसीकरण आणि चाचणी या दोन्ही प्रक्रिया अनेक केंद्रांवर करण्याचे नियोजन करण्यात येत होते; परंतु त्यातून संसर्ग कशा प्रकारे पसरू शकतो, ही बाब ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर समोर आली. त्यामुळे लसीकरण आणि चाचणी या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या जातील.
फोटो ओळ...
एन-८ येथील आरोग्यवर्धिनी केंद्राबाहेर कोरोना चाचणी सेंटर एन-७ येथे हलविण्यासंदर्भात लावलेला फलक.