औरंगाबाद : नागपूर येथील कॅबचालकाच्या हत्येचा उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांना यश मिळाले आहे. लातूर जिल्ह्यातील आरोपींना कॅब हवी असल्यामुळे त्यांनी नागपूर येथे जाऊन बुकिंग करीत जालना जिल्ह्यात आल्यानंतर कॅबचालकाचा खून केला. या गुन्ह्यात तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विशाल वासुदेव रामटेके (वय ३२, रा. नागपूर) या तरुणाची हत्या झालेली असून, आरोपींमध्ये विशाल राजेंद्र मिश्रा (रा. कादरीनगर, ता.औसा), शिवाजी दत्तू बनसोडे (रा. कबीरनगर, ता. औसा), सुदर्शन जनकनाथ चव्हाण (रा. उजनी, ता. औसा) यांचा समावेश आहे. अधीक्षक गोयल म्हणाले, विशाल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो पुण्यात ओला कंपनीत कॅब चालवत होता. त्याची कॅब नळदुर्ग पोलिसांनी लुटमारीच्या गुन्ह्यात जप्त केली. त्यामुळे त्याने गावाकडील मित्र सुदर्शन, शिवाजीसोबत मिळून पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनासारखे हुबेहूब दुसरे वाहन पळविण्याचा कट रचला. त्यासाठी त्यांनी नागपूर गाठत रामटेके यांची कॅब जालना येथे जाण्यासाठी बुक केली. तिघांना घेऊन जालना येथे जाताना आरोपींनी लघवीसाठी वाहन थांबविण्याचे चालकाला सांगितले. मग तिघांनी चालक रामटेके यांना मारहाण केली. त्यांनी प्रतिकार केल्यामुळे त्यांच्या डोळ्यात तिखट टाकून नायलॉन दोरीने गळा आवळला. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी गाडीतील लोखंडी पट्टीने पोटात भोसकले. रामटेके मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर मृतदेह वाहनातून गोलटगाव परिसरातील झुडपात आणून टाकत आरोपी फरार झाले.
आरोपी असे अडकले जाळ्यात३१ डिसेंबर रोजी निर्घृण खून केलेला मृतदेह सापडल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर हत्या करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर येथील रेकॉर्ड काढून आरोपींचा शोध घेतला. संशयितांची नावे समोर आल्यानंतर औसा तालुक्यातून शिवाजी यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने सुदर्शन व विशालसोबत खून केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पुण्यात छापा मारून उर्वरित दोघांच्या मुसक्या आवळल्याची माहिती अधीक्षक गोयल यांनी दिली. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष खेतमाळस, करमाडचे निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या पथकांनी केली.