...अन् मातेने मुलीला मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर फेकले
मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची चळवळ येथे सुरू झाली. याचदरम्यान, फेबु्रवारी १९७८ मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील मंत्रिमंडळाने राज्यातील कोणत्याही संस्थेचे नाव न बदलण्याचा ठराव घेतला. त्यानंतर १९७८ मध्ये औरंगाबादमध्ये आलेल्या वसंतदादा पाटील यांना भारतीय दलित पँथरने निवेदन देणार होते. पण, हजारो आंदोलकांना टाळून वसंतदादांचा ताफा पुढे निघाला. याचवेळी औरंगाबादच्या जमुनाबाई अप्पा गायकवाड या महिलेने आपल्या काखेतील दोेन-तीन महिन्यांच्या चिमुरडीस ताफ्यातील मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर फेकले. त्यामुळे ताफा थांबला. पण, यात ती चिमुरडी संगीताला कायमचे अपंगत्व आले. आज दोन्ही मायलेकी गुलमंडीवर भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह चालवितात.
रणरागिणीही आघाडीवरनामांतराच्या लढाईत पुरूषांबरोबर महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. नसेल आमच्या घरात पीठ पण आम्हाला हवं विद्यापीठ, असे म्हणत नामांतराच्या मागणीसाठी झालेल्या प्रत्येक आंदोलनात महिला पुढे होत्या. सर्वत्र नामांतरमय वातावरण असताना प्रा.सुशीला मूलजाधव, शोभा लभाने, प्रा. अनुराधा कांबळे यांच्या नेतृत्त्वात माहिलांनी औरंगाबादमध्ये शांतता मोर्चाची हाक दिली. शहरातील विविध भागात फिरून त्यांनी महिलांना आंदोलनास सज्ज केले. त्यानंतर भरपावसात प्रा. सुशीला सर्वे, सुजाता कांगो, डॉ. कुंदा चौधरी, मिलिंद प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिकांसह भडकल गेटवर पोहोचलेल्या १५० महिलांनी स्वत:ला अटक करून घेतली. त्यानंतर येरवड्यात तुरूंगवासही भोगला. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी काढलेल्या लाँगमार्चलाही महिलांनी प्रतिसाद दिला. औरंगाबाद येथे झालेल्या कवाडे यांच्या सभेत पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांच्या अमानुष मार महिलांना झेलला. सर्वच आंदोलनात महिलांची संख्या कायम लक्षणीय राहिली.
नामांतर लढ्याचे रणशिंग फुंकले दलित पँथरनेच...अन्याय अत्याचाराविरूद्ध लढणारा पँथर हा नामांतर चळवळीचा अग्रणी नायक राहिला. रामदास आठवले, गंगाधर गाडे, अॅड. प्रीतमकुमार शेगावकर, दौलत खरात, अॅड. रमेशभाई खंडागळे, रतनकुमार पंडागळे , मिलिंद शेळके, प्रकाश जावळे आणि तमाम तरण्याबांड पँथरने ही चळवळ नेटाने पुढे रेटली. विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची सर्वप्रथम जाहिर मागणी व त्यासाठी आंदोलन करणाऱ्या पँथरने नामांतरासाठी सर्वाधिक मोर्चे, धरणे, निदर्शने ,आंदोलने केली. औरंगाबाद शहर पातळीवर असलेला हा लढा पँथरने अल्पावधीत मराठवाड्यातील गावोगावी नेला. त्यामुळे मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांना या प्रश्नाची दखल घ्यावी लागली. आपल्या लोकशाहीवादी आंदोलनाने मुख्यमंत्र्यांनाही जेरीस आणणाऱ्या पँथरने नामांतर अंतिम टप्प्यात असतांना डिसेंबर १९९३ मध्ये उभारलेला ‘नामांतर बलिदान सत्याग्रह’ भव्य होता. आठवडाभर चाललेल्या या आंदोलनात औरंगाबादेतून एकाच दिवशी दीडहजाराहून अधिक कार्यकर्त्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली होती.
...अन् प्रेक्षक गॅलरीतून त्यांनी घेतली विधानसभेत उडीनामांतर आंदोलनात अनेक कार्यकर्ते, नेत्यांनी आंदोलनाचे वेगवेगळे मार्ग चोखाळले. औरंगाबादेतील कार्यकर्ते वसंतराव नरवडे यांनी १९८२ साली अधिवेशन सुरू असतांना प्रेक्षक गॅलरीतून विधानसभेत उडी घेतली होती. विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळालेच पाहिजे, अशी घोषणा त्यांनी तत्पूर्वी केली व मागेपुढे न पाहता स्वत:ला खाली झोकून दिले. मुख्यमंत्रीपदी शरद पवार होते. या घटनेने देशात खळबळ उडाली होती. नरवडे यांना या प्रकरणात तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविण्यात आले.
कवाडेंचे वेशांतर अन् पोलिसांचा जबर लाठीमारमिलिंद परिसरात १० मार्च १९८४ रोजी नामांतरच्या समर्थनासाठी मेळावा आयोजित केला होता. जोगेंद्र कवाडे यांना जिल्हा बंदी होती. परंतु ही बंदी मोडत ते वेशांतर करून अचानक मंचावर हजर झाले व भाषणाला सुरवात केली. पोलिसांनी जमलेल्या स्त्रीपुरूषावर अचानक लाठीमार केला. महिलांनी कवाडे यांना कडे करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस आधिकाऱ्याने सर कवाडे यांच्यावर पिस्तुल रोखले. तत्कालीन पोलीस हवालदार नामदेवराव विठ्ठलराव दांडगे यांनी हिंमत दाखवून पोलीस अधीक्षकांचे पिस्तुल ओढले. पोलिसांनी मग त्यांच्यावर बेदम लाठीहल्ला केला. त्यात कवाडे यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले. एका बाजूने पोलिसांचा वेढा तर दुसऱ्याबाजुला खांबनदीच्या किनाऱ्यावर काटेरी झाडी आणि तार लावलेली होती. ती ओलांडतांना अनेक स्त्री-पुरूष, मुले जखमी झाली. पोलीस लाठीमारातही अनेकांचे हातपाय मोडले. सीताराम भगत सारखी अनेक मंडळी कायमची अपंग झाली. दांडगे यांच्या पत्नी शोभा दांडगे यांनी जखमींना त्यांच्या घरात आसरा दिला. त्यामुळे दांडगे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. नामांतर झाल्यावर त्यांना पुन्हा सेवेत रूजू करून घेतले. या आंदोलनात गोपाळराव आटोटे गुरूजी गंभीर जखमी झाले अॅड. जे.के. नारायणे, गणेश पडघन गुरूजी, मामासाहेब सरदार, इ.मो. नारनवरे , तानसेनभाई नन्नावरे, नामदेव खोब्रागडे, थॉमस कांबळे आदी सोबत होते.
नामांतरवादी एस.एम. जोशी यांचा अवमानदलित नवबौद्ध वगळता अनेक सवर्णमंडळी नामांतराच्या लढ्यात सक्रीय होती. त्यामुळे त्यांना जातीयवादी सवर्णांचा तडाखा सहन करावा लागला. नामांतरवादी ज्येष्ठ समाजवादी नेते एस.एम. जोशी यांना हा अवमान सहन करावा लागला. ते उदगीर दौऱ्यावर असतांना नामांतरविरोधी तरूणाने त्यांच्या गळ््यात चपलांचा हार टाकला होता. पुढे हाच तरूण नामांतरवादीही झाला. या घटनेबद्दल त्या तरूणाने माफी मागून नामांतराच्या लढ्यात सामील झाला. डॉ. बाबा आढाव यांचीही हेटाळणी नामांतरविरोधींनी केली . परंतु या लढ्यात बाबा दळवी, भाई वैद्य, किशनराव देशमुख, जनार्दन तुपे, विजय गव्हाणे, वसंत काळे, तुकाराम पांचाळ, निहाल अहमद, खा. बापू काळदाते, पांडूरंग सोळुंके, ही मंडळी सतत नामांतराच्या बाजूने राहिली व लढली.
अत्याचाराचे पेंटीग काढून प्रदर्शनेनामांतराच्या आंदोलनात प्रत्येकाने आपल्या परीने सहभाग नोंदविला. बीडचे कलावंत डॉ. बी.जी. जावळे यांनी गावोगावी फिरून राख रांगोळी झालेली घरे, वस्त्या, अत्याचाराचे वास्तव पेंटीग तयार केले. ज्या बाबी पत्रकार समोर आणू शकले नाहीत,त्या बाजू डॉ. जावळे यांनी समोर आणल्या. या पेंटींगचे त्यांनी गावोगावी प्रदर्शने भरविली. त्यातून दलितावरील अत्याचार जगाच्या वेशीवर टांगले. परंतु १९८९ मध्ये बीडमध्ये महापूर आला व त्यात या १५० पेंटींग नष्ट झाल्या.
आमदार उपेंद्र शेंडे यांचे उपोषणमराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे (खो) आमदार उपेंद्र शेंडे यांनी १५ आॅगस्ट १९९३ पासून मंत्रालयापुढे बेमुदत उपोषणाला सुरवात केली. या काळात राज्यभर मोर्चे, धरणे आंदोलने सुरू होती.
पंतप्रधान राजीव गांधी विमानातून उतरले...तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत शरद पवार औरंगाबाद मुक्कामी काँग्रेसमध्ये सामील झाले. तेव्हा पँथर नेते गंगाधर गाडे व इतरांनी पवार यांची भेट घेऊन त्यांच्यामार्फत पंतप्रधान राजीव गांधी यांची भेटीची वेळ ठरविली. ठरल्यावेळेनुसार शिष्टमंडळ विमानतळावर भेटीस गेले. परंतु पंतप्रधान आले व थेट विमानात जाऊन बसले. त्यामुळे आक्रमक कार्यकर्त्यांनी थेट विमानच रोखण्याची धमकी दिली. शेवटी शरद पवारांनी विमानात जाऊन राजीव गांधी यांना हा निरोप दिला व पंतप्रधान विमानातून उतरून शिष्टमंडळाच्या भेटीस आले.
तर मी प्रवेशद्वारासमोर आत्मदहन करीन....प्रा बापुराव जगताप यांनी एक आठवण सांगितलेली आहे, मी पत्रकार परिषद घेतली व घोषणा केली, ‘‘ नामांतर झालं नाही तर मी विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर आत्मदन करीन’. ही बातमी दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात झळकली. झालं, बाबा दळवी आले धावत. म्हणाले, बापूराव , हा काय पोरकटपणा चालवला आहे. तुम्ही कृती समितीचे जबाबदार कार्याध्यक्ष आहात. हा काय कृती समितीचा कार्यक्रम आहे का? तुम्ही जळून मेलात तर काय होईल ? नामांतर होईल ?लाखो भीमसैनिकांचा भव्य मोर्चामराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, विधीमंडळाने संमत केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करावी, अशी एकमेव मागणी करीत २७ जुलै १९८८ रोजी मुंबईतील आझाद मैदानावरून विधानसभेवर लाखो भीमसैनिकांचा मोर्चा निघाला. विशेष म्हणजे सर्व रिपब्लिकन व दलित संघटनांच्या एकजुटीतून तयार झालेल्या ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीतर्फे हा मोर्चा काढण्यात आला होता. ज्येष्ठ नेते रा. सु. गवईल, दलित मुक्ती सेनेचे प्रा. जोगेंद्र कवाडे, पँथर नेते रामदास आठवले, बाबासाहेब गोपले, नामदेव ढसाळ, भाई संगारे, हाजी मस्तान आदी नेत्यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.