- स. सो. खंडाळकर
चर्मकार समाज आजही पुरेसा आंबेडकरवादी नाही; पण या समाजातील श्रावण गायकवाड हे स्वत:चा विवाह बौद्ध पद्धतीने करून घेतात. मी कट्टर आंबेडकरवादी आहे’, असे अभिमानाने सांगतात. पूर्वी ते दलित पँथरमध्ये होते. आज रिपाइं ए मध्ये आहेत. नामविस्तार दिनाच्या रौप्य महोत्सवानिमित्त ते लोकमतशी बोलत होते. ते म्हणाले, ६ डिसेंबर १९७९ रोजी क्रांतीचौकात सत्याग्रह झाला. वयाच्या १५ व्या वर्षीच मी या सत्याग्रहात सामील झालो होतो. मलाही अटक झाली; पण वयाने लहान असल्याने सायंकाळी सोडून देण्यात आले. पुढे मी दलित पँथर या संघटनेच्या माध्यमातून नामांतराच्या लढ्यात सतत सहभागी होऊ लागलो.
नामांतरवादी कृती समितीच्या वतीने आझाद मैदान, मुंबई येथे ५ सप्टेंबर १९८२ रोजी जेलभरो आंदोलन करण्यात आले. त्यावेळीही अटक केल्यानंतर मला येरवडा जेलमध्ये १५ दिवस ठेवण्यात आले. १४ जानेवारी १९८४ रोजी नामविस्ताराचा निर्णय झाला; पण खबरदारीचा उपाय म्हणून १४ जानेवारीच्या पूर्वसंध्येलाच आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतले. हर्सूल जेलमध्ये ठेवले; पण १६ वर्षांच्या संघर्षानंतर नामविस्तार झाल्याने अतीव आनंद झाला, असे श्रावण गायकवाड यांनी नमूद केले.
ते म्हणाले, नामांतराचा लढा प्रदीर्घ चालला. अनेकांना शहीद व्हावे लागले. अनेकांचे रक्त सांडले; पण बाबासाहेबांच्या नावाने असलेल्या या विद्यापीठाची आजची परिस्थिती बघवत नाही. तेच ते घाणेरडे, संकुचित राजकारण...! शिक्षण सोडून बाकीच्याच गोष्टी जास्त. आता तर विद्यापीठात शिकवायला प्राध्यापक नाहीत. विद्यार्थी सारे वाऱ्यावर. हे बाबासाहेबांना मुळीच अपेक्षित नव्हते. या विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जासुद्धा मिळू शकत नाही. पुन्हा त्यासाठी संघर्षच करावा लागेल की काय, अशी परिस्थिती. बाबासाहेबांच्या नावाचे हे विद्यापीठ त्यांच्या विचारानुसार चालले पाहिजे, ही अपेक्षा.