औरंगाबाद : '' सहा डिसेंबर १९७९ ला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनी शासन करीत नसेल तर आम्ही आपल्या हाताने विद्यापीठाच्या नामांतराचा फलक विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर फडकावून बाबासाहेबांना अभिवादन करू " ह्या एकाच ध्यासाने प्रा. जोगेन्द्र कवाडे या तरुण नवख्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठा आंबेडकरी समुदायाचा लाँगमार्च गतिमान झाला. परिणामांची पर्वा न करता यात बाया-बापड्या, किशोर-तरुण-वृद्ध भीमसैनिक म्हणून त्यात सहभागी झाले.
औरंगाबादमधील विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव १९७८ ला दोन्ही विधिमंडळात संमत झाला आणि इकडे मराठवाडा पेटला. आंबेडकरी समुदायांच्या वस्त्यांवर जीवघेणे झाले. हे हल्ले थांबायला तयार नव्हते, यात अनेक भीमसैनिकांचे मुडदे पडले, आया-बहिणींच्या इज्जतीवर घाला झाला, घरादारांची राखरांगोळी झाली. हे सारे चित्र प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी शहीद पोचीराम कांबळे आणि जनार्दन मवाडे यांच्या कुटुंबाना जमा केलेली आर्थिक मदत देण्यासाठी गेले असता पाहिले. नागपूरला परत आले असता त्यांना मराठवाड्यातील परिस्थिती स्वस्थ बसू नव्हती. यातच नागपुरात औरंगाबाद विद्यापीठाचे नामांतर करा आणि मराठवाड्यातील आंबेडकरी वस्त्यावरील हल्ले थांबवा यासाठी निघालेली दोन मोर्चे चिरडली गेली. या पार्श्वभूमीवर प्रा. कवाडे यांनी 'लॉंगमार्च'ची हाक दिली आणि नागपूर परिसरातील आंबेडकर समाज चेतून उठला.
११ नोव्हेबरच्या पहाटे सूर्य जागण्यापूर्वी कितीतरी आधी नागपुरातला आंबेडकरी समाज जागला होता. शहरातील व नागपूरच्या आजूबाजूच्या भागातील निळ्या रक्ताच्या तमाम वस्त्यामधून भीमसैनिक पूर्व संधेलाच दीक्षाभूमीवर जोशात दाखल झाले होते. भीमसैनिकांचा लाँगमार्च दीक्षाभूमीवरून सकाळी ११.४५ वाजता मार्गक्रमण झाला. रस्त्याच्याकडेला दुतर्फा उभे राहून लोक हे ऐतिहासिक दृश्य आपल्या डोळ्यात साठवून ठेवत होते. आश्चर्यमिश्रित तितकाच कौतुकाचा भाव त्यांच्या डोळ्यांतून ओसंडत होता. 'लोकमत' चौकात लाँगमार्चचा अग्रभाग आला तेव्हाही लाँगमार्चचे शेवटचे टोक दीक्षाभूमीवरच होते. एवढा लांब भीमसैनिकांचा हा 'मार्च' नागपूकरांसाठी अनौखा होता. मैल दर मैल करत वस्त्या - पाड्यावर विसावा घेत लाँगमार्च बुरीबोटी- केळझर- वर्धा - देवळी - गलमगाव - कळंब - यवतमाळ - बोरी अरब - कारंजा - मंगरूळपीठ - बिटोडा - वाशीम - मालेगाव - डोणगाव - मेहकर - दुसरबीडपर्यंत पोहंचला. या तब्बल ४७० किमीच्या अंतरात लॉंगमार्चमध्ये हजारोंनी भीमसैनिक सहभागी झाले होते. यातील कोणालाही चालण्याचा सराव नव्हता मात्र त्यांनी एका नव्या उर्जेने हा पल्ला पार केला. कसलीही सुविधा नसतांना अंधारात, काट्याकुपाट्या तुडवत, थंडी, पाऊस वारा अंगावर घेत भीमसैनिक पुढ जात होते. मजल दर मजल करत मिळेल ते अन्नपाणी घेत, जमिनीला अंथरून करत आणि उघड्या आकाशाचे पांघरून करत पेटलेला हा भीमसागर औरंगाबादला पोहचण्यास आतुर झाला होता.
दुसरबीडजवळ लॉंगमार्च मोडीत काढला राहेरी या दुसरबीड जवळील शिवारात शासनाने तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या मार्गावरील साखर कारखान्याजवळ येताच आज काहीतरी विपरीत घडणार याची सर्वांना कल्पना आली होती. राहेरीच्या शिवारात येताच पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. अटक करायची असल्यास करा असे सांगत सारे भीमसैनिक तिथेच मुक्कामी थांबले. मात्र, पोलिसांनी पूर्वनियोजित पद्धतीने २७ नोव्हेंबरच्या मध्यरात्री मनुष्यवस्तीपासून दूर विसावा घेतलेल्या भीमसैनिकांना ताब्यात घेण्यात सुरुवात केली. यामुळे एकच गोंधळ उडाला पोलीस अमानुषपणे मारहाण करत सर्वांना ताब्यात घेत होते. हे कळताच मारहाणीचा जाब विचारण्यास प्रा. कवाडे, मामा सरदार, इ.मो. नारनवरे पोलिसांच्या दिशेने सरसावले, त्यांना पाहताच पोलिसांनी त्यांच्यावर लाठ्यांचा वर्षाव केला. शेवटी सर्वांना ताब्यात घेत वेगवेगळ्या २२ बसमध्ये टाकून पोलीस घेऊन गेले. यानंतर प्रा. कवाडे यांना मेहकरच्या जेलमध्ये तर अन्य भीमसैनिकांना नागपूर, अकोला आणि अमरावतीच्या जेलमध्ये ठेवण्यात आले. १२ डिसेंबरला सर्वांची अतोनात हाल करून सुटका करण्यात आली. मात्र, जेलमधील संपूर्ण काळात प्रा. कवाडे आणि भीमसैनिक यांची भेट नव्हती. जेलमधून अन्य भीमसैनिकांची सुटका झाली तरीही प्रा. कवाडे यांचे ठिकठिकाणच्या पोलिसांकडून कितीतरी दिवस सारखे अटकसत्र सुरू होते.
येणाऱ्या पिढ्यांना उर्जा देणारा लढा भीमसैनिकांना हक्क, अधिकार, जमिनी असा सार संघर्षाशिवाय मिळाले नाही. हे सारे लढे समाजास काहीतरी लाभ मिळविण्यासाठी होता. मात्र नामांतराचा हा लढा केवळ अस्मितेचा होता. या दरम्यान आमच्याकडे केवळ आमच्या शब्दांचेच हत्यार होते, नेत्यांची भाषणे, एकांकिका, नाटिका आणि क्रांतीगीते यांनी आम्ही भीमसैनिकांना प्रेरित करत असू. या लढ्याने येणाऱ्या पिढ्यांना नवी उर्जा देण्याचे,स्वाभिमानाला नवी धार दिली. काहीजण यास नामविस्तार म्हणतात पण विधिमंडळ ठरावाप्रमाणे हे नामांतरच आहे. - कवी इ. मो. नारनवरे, नागपूर
लॉंगमार्चने नामांतराचा प्रश्न देश पातळीवर नेलालोकशाही मार्गाने निघालेल्या लॉंगमार्चने नामांतराच्या प्रश्नाची देश पातळीवर दखल घेण्यास भाग पाडले. ऐतिहासिक अशा या आंदोलनात आम्ही सर्व धर्माच्या लोकांना सहभागी करून घेत हा लढा सतत तेवत ठेवला. तसेच लॉंगमार्चच्या मार्गात आणि त्यानंतरही भीमसैनिक आणि सवर्ण असा वाद होणार नाही याची दक्षता घेतली. अनेक मोर्चे, आंदोलने, धरणे करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठास देण्यात आले त्या दरम्यान मला हर्सूलच्या जेलमध्ये १५ दिवस डांबून ठेवले होते. यामुळे मी त्या दिवशी या सुवर्णक्षणाचा आनंद घेऊ शकलो नाही. - जे. के. नारायण, औरंगाबाद
जीवनाचे सार्थक झाले मिळेल ते अन्न आणि पाणी यावर निघालेल्या या लॉंगमार्चच्या अविस्मरणीय आठवणी आजही माझ्या समोर आहेत. पायी अंतर कापत आम्ही सारे थंडी, वारा पाऊस याची तमा न बाळगता पुढे जात असत. डोक्याला कफन बांधून निघालेले सारे भीमसैनिक कधी शिळ्या तर कधी बुरशी आलेल्या भाकरी खाऊन नदीचे पाणी पीत पुढे सारेजण न थकता पुढे निघत. पुढच्या टप्प्याला सर्वांची राहण्याची आणि जेवणाची काय व्यवस्था होईल याची जबाबदारी आम्ही काहीजण पुढे जाऊन बघत. या अभूतपूर्व आंदोलनात सहभागी होऊन जेव्हा डॉ. बाबासाहेबांचे नाव विद्यापीठास मिळाले तेव्हा जीवनाचे सार्थक झाल्याची भावना मनात आली. - थॉमस कांबळे, नागपूर
अभिमान आहे लॉंगमार्चमध्ये सहभागी होतो औरंगाबादच्या दिशेने लॉंगमार्च निघणार याची माहिती मिळाताच आम्ही गोंदियावरून शेकडो भीमसैनिकांसह आदल्या रात्रीच दीक्षाभूमीवरू आलो. औरंगाबादच्या दिशेने कूच करणे तेही दूरवर पायी चालण्याची सवय नसतांना एक एक भीमसैनिक यात जोडला जात होता. हे सारे उत्स्फूर्त होते. ठीक ठिकाणाहून लॉंगमार्चमध्ये हजारो भीमसैनिक अपार उत्साहाने आम्हाला सोबत करत, त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने आमचा थकवा क्षणात जायचा. प्रत्येक मुक्काम भीमसैनिकांचा सहभाग वाढविणारा होता.- महेंद्र नागदिवे, गोंदिया
अपुऱ्या व्यवस्थेवर निघालो मात्र जिंकलो डॉ. बाबासाहेबांचे नाव विद्यापीठास देयचे आहे, या एकाच ध्येयाने आम्ही सारे गोंदियावरून लॉंगमार्चमध्ये सहभागी होण्यासाठी दीक्षाभूमीवर आलो. येथे येणारा आमचा पहिला जत्था होता. लॉंगमार्च पूर्वी याच्या प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी आम्ही पार पाडली होती. यानंतर लॉंगमार्चमध्ये सहभागींच्या सोयीसुविधांचे व्यवस्थापन करणे हे आम्ही उत्साहाने केले. तुटपुंज्या रसदीवर आम्ही मोठ्या निर्धाराने कूच करत असत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये नामांतराचा लढा आम्ही उभारला. मोठ्या संघर्षानंतर जेव्हा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव मिळाले तेव्हा लढयास यश मिळाले याचे समाधान वाटले.- सतीश बनसोड, गोंदिया
अतुलनीय असा लॉंगमार्च मोठ्या भावामुळे प्रा. कवाडे यांच्या नेतृत्वात लॉंगमार्च निघणार याची माहिती मिळाली. नागपूरला माझ्या ताईला, मी नामांतर करण्यासाठी जात आहे ऐवढे सांगून घर सोडले होते. या दरम्यान, अतुलनीय अशा लॉंगमार्चच्या नोंदी मी टिपून घेत असे. आमचा चारपाच जणांचा एक गटच तयार झाला होता. एकजण चित्र काढत असे तर मी प्रत्येक सभेचे, भाषणांचे, घोषणेचे, अनुभवांचे टिपण काढत असे. माझ्या मते स्वातंत्र्यानंतर निघालेले हा लॉंगमार्च केवळ अतुलनीय आहे. - दिवाकर गायकवाड, नागपूर