जाळले गेलो तरी सोडले नाही तुला...कापले गेलो तरी सोडले नाही तुला...घे तुला या उद्ध्वस्त झालेल्या घरांची वंदना...भीमराया घे तुला या लेकरांची वंदना...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाची १९५० मध्ये औरंगाबादेत स्थापना केली. त्यानंतर काही दिवसांनी गोविंदभाई श्रॉफ व मानिकचंद पहाडे हे नागसेनवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भेटले व म्हणाले, येथे कॉलेज चालेल का, त्यावर बाबासाहेब उत्तरले येथे लवकरच विद्यापीठाचीही गरज लागेल. सर्वार्थाने मागास मराठवाड्यात विद्यापीठाची गरज असल्याचे डॉ. बाबासाहेबांनी तेव्हाच हेरले. पुढे मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली व विद्यापीठाचे अनेक विभाग मिलिंद महाविद्यालयातच सुरू झाले. एवढेच नव्हे तर मिलिंदच्या मातीतून तयार झालेले प्राचार्य एम.बी. चिटणीस हे या विद्यापीठाचे पहिले कुलसचिवही झाले.
हैदराबादच्या निजामाशी लढून येथील जनतेने मराठवाडा मु्क्त केला. हा लढा म्हणजेच एक स्वातंत्र्यसमरच होते. त्यामुळे या जनतेची प्रादेशिक अस्मिता टोकाची झाली होती. १९५७ मध्ये विद्यापीठाची स्थापना झाली तेव्हा समितीने विद्यापीठाला मराठवाडा हे प्रादेशिक अस्मिता वाचक नाव दिले. पुढे विधि मंडळाने विद्यापीठ नामांतराचा ठराव मंजूर केला. तो ठरावच मुळात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असाच होता. त्यात मराठवाड्याच्या प्रादेशिक अस्मितेला कुठेही धक्का लावण्यात आलेला नव्हता. प्रकांड पंडित व कट्टर लोकशाहीवादी आणि समतेचे पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला देण्याच्या शासनाच्या कृतीचे सर्वच समतावाद्यांनी सहर्ष स्वागत केले. यात फक्त दलितच नव्हे तर सर्वच जातीधर्मीय व सर्वपक्षीयांचा समावेश होता. दुर्दैवाने या नामांतरास मराठवाड्यात प्रचंड विरोध झाला व त्यातून जातीय भावना कमालीच्या उग्र झाल्या. त्यामुळे सरकारने नामांतर ठरावाची अंमलबजावणी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. समाजात निर्माण झालेला वैरभाव व दुजाभाव दूर करून समता प्रस्थापित करण्यासाठी मग सर्वच जातीधर्म, विचारधारेला मानणाऱ्यांनी तब्बल १६ वर्षे येथील असहिष्णुतेशी लढा दिला. या समतेच्या संगराला जगाच्या इतिहासात कुठेच तोड व जोडही नाही.
१९५७ मध्ये स्थापन झालेल्या मराठवाडा विद्यापीठ समितीसमोर विद्यापीठाच्या विविध नाव प्रस्तावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज या दोन महापुरुषांसह ६७ नावे होती. उर्वरित सर्व नावे स्थळवाचक व भूमिवाचक होती. १९६० मध्ये कोल्हापूर विद्यापीठाला शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले. त्यामुळे महाराजांचे नाव यावेळी पुढे येण्याचे कारण नव्हतेच. पुढे १९७७ मध्ये महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा (समता आंदोलन) सुवर्ण महोत्सव साजरा करताना मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी जोशाने पुढे आली. लगोलग आंदोलने सुरू झाली. १८ जुलै १९७७ रोजी विद्यापीठ कार्यकारिणीने नामांतराचा प्रस्ताव पारित केला. त्यानंतर राज्य सरकारही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचे लक्षात येताच सवर्णांचा विरोध संघटित होऊ लागला. या विद्यापीठाला प्रकांड पंडिताचे नाव दिले जात असताना मराठवाड्याच्या अस्मितेच्या नावा आडून वर्ण अहंकार पेटविला गेला. एका साध्या सरळ मागणीने ऐतिहासिक संघर्षाचे रूप घेतले.
राज्य विधिमंडळाने २७ जुलै १९७८ रोजी नामांतराचा ठराव मंजूर करताच मराठवाड्यात जातीय हिंसाचार पेटला. धर्माभिमानाने पेटलेल्या विखारी मनांनी दलित-नवबौद्धांच्या वसाहतीवर संघटित व सशस्त्र हल्ले चढविले. या वस्त्या पेटवून देण्यात आल्या. प्रंचड लुटालूट झाली. महिलांवर हात टाकले गेले. सामूहिक अत्याचार झाले. आंबेडकरवाद्यांना जिवंत जाळणे, तोडणे, डोळे फोडण्यापर्यंत निर्दयीपणाचा कळस गाठला गेला. दलितांच्या सार्वजनिक पाणवठ्यात विष, विष्ठा कालविण्याचे प्रकार सर्रास घडले. त्यांच्या उभ्या पिकात जनावरे सोडण्यात आली. मजबूत घरे सुरुंगाची दारू लावून उडविण्यात आली. हे सर्व अत्याचार नियोजनबद्धरीतीने करण्यात आले. एका दलित वसाहतीला झोडपण्यासाठी सवर्णांची अनेक गावे एकत्रित येत होती. दलितांना पोलिसांची मदत मिळू नये म्हणून रस्ते खोदणे, झाडे तोडून टाकणे, टेलिफोन यंत्रणा बंद पाडणे, आदी प्रकारही झाले. एवढेच नव्हे तर अनेक गावांवर सामूहिक बहिष्कार टाकला गेला. त्यातून दलितांची रोजगारासह संपूर्ण कोंडी करण्याचे प्रयत्न झाले. या अत्याचारात सहभागी होण्यास इच्छुक नसलेल्या विवेकी व्यक्तींना देवाच्या शपथी देऊन गप्प बसविण्यास भाग पाडले गेले. अशा अनन्वित अत्याचाराने मराठवाडा माणुसकीला पारखा झाला होता; पण या आंदोलनातून एक आशादायक वस्तुस्थिती समोर आली ती ही की, काही सवर्ण व्यक्ती आणि काही संघटनांही नामांतराच्या बाजूने होत्या व त्या आंदोलनात सक्रिय कामही करीत होत्या.
पोलीस यंत्रणाही या दीनांना संरक्षण देण्यास पुरेशी नव्हती. अत्याचार झालेल्या गावात तब्बल आठ-आठ दिवसांनंतर पोलीस गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे संरक्षण मागणाऱ्याच्या मागणीचा विचार करणेच शक्य नव्हते. सवर्णांसह पोलीस प्रशासनाने केलेल्या अत्याचाराच्या कथाही माणुसकीला हादरा देणाऱ्या आहेत. या हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटले. जगभरात देशाची दुष्कीर्ती झाली.
या राक्षसी हल्ल्याने भेदरलेला दलित-नवबौद्ध समाज वर्षभर अक्षरश: गलीतगात्रच झाला होता. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी १९७९ मध्ये काढलेल्या लाँगमार्चने मग नामांतर लढ्याने कूस बदलली. पुढे १६ वर्षे झालेल्या आंदोलनांना जगात तोड व जोडही नाही. बलिदानाचे कफन बांधून लढलेला हा लढा एक शौर्यगाथाच आहे. नामांतरासाठी हजारो मोर्चे निघाले. बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला मिळावे म्हणून लोक उपाशी पोटी रस्त्यावर येत. त्यांना कशाचीच तमा नव्हती. एकच ध्येय होते ते नामांतर. अर्थात ही मागणी मान्य झाली तरी त्यांना वैयक्तिक काहीच फायदा नव्हता; परंतु ‘बाबासाहब के नाम पर मर मिटेंगे’ असे म्हणून आबालवृद्ध लढ्यात सहभागी होत असत. एक वेळ तर अशी आली की, राज्यातील सर्वच तुरुंग आंदोलकांमुळे ओहरफ्लो झाले. त्यामुळे पोलिसांनीच आंदोलकांना अटक करणेच बंद केले. रेल रोको, रास्ता रोको, एवढेच नव्हे तर एका विमानाचे अपहरणही मागणीसाठी झाले. अनेकांनी नामांतरासाठी आत्मबलिदानही दिले.
नामांतर लढा हा समता चळवळीच्या विजयाचा आहे तसाच तो महाराष्ट्रातील प्रबोधन परंपरेचा पराभवाचाही आहेच. सामाजिक समतेचा अधिनायक असलेल्या महामानवाचे नाव एका विद्यापीठाला देण्यासाठी नीतिमत्तेचे झालेले वस्त्रहरण जगाने पाहिले. का झाले हे सर्व तर... दलित पायरीने राहत नाहीत. ही पायरी कोणती तर विषमतेची. जातीयतेची. दलितांनी अंगीकारलेल्या स्वाभिमानाला ठेचण्याचा प्रादेशिक अस्मितेचा फोड नामांतरामुळे फुटला. त्यातून उभ्या राहिलेल्या समतावाद्यांच्या नामांतर चळवळीने जगात इतिहास घडविला.
- - शांतीलाल गायकवाड