- स. सो. खंडाळकर
बदनापूरजवळील अकोला निकळक व गंगापूर तालुक्यातील आपेगावच्या दलितांच्या घरादारांची राखरांगोळी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांचे पुनवर्सन करणे गरजेचे होते. ज्या गावाने आमची घरेदारे जाळली, तेथे आम्ही पुन्हा राहायला जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. जिल्हा प्रशासनातर्फे हर्सूलच्या नदीत त्यांना राहण्यासाठी तात्पुरती जागा देण्यात आली; परंतु ती जागाही राहण्यायोग्य नसल्याने मी स्वत: पुढाकार घेऊन सिद्धार्थनगरातील जागा दिली. एकूण ३७ कुटंबांची त्याठिकाणी राहण्याची सोय केली. नामांतर कॉलनी म्हणून ही वसाहत ओळखली जाऊ लागली. पुढे माझी पत्नी नगरसेविका झाल्यानंतर नामांतर कॉलनीची कमान उभी केली गेली, अशी माहिती तत्कालीन दलित पँथरचे नेते व आता ‘रिपाइं-ए’चे वरिष्ठ नेते दौलत खरात यांनी दिली. नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘लोकमत’शी ते बोलत होते.
‘लोकमत’मुळे ताकद मिळाली त्यांनी सांगितले की, १९८२ साली ‘लोकमत’औरंगाबादहून सुरू झाला आणि नामांतरवाद्यांना एक मोठी ताकद मिळाली. ‘लोकमत’मुळे नामांतर विरोधाची धार बोथट व्हायला फार मोठी मदत झाली. त्याआधी नामांतराच्या विरोधात विषारी लिखाण होत होते. दंगली भडकाविण्यास हे लिखाणच कारणीभूत होत गेले. ‘लोकमत’मुळे नामांतर लढ्याला बळ मिळाले आणि ही लढाई जोरात सुरू होऊन रंगत गेली व त्यात यशही मिळाले. नामांतर लढ्यामुळे दलित कार्यकर्ता धीट व स्वाभिमानी बनला.
दलितांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले आणि देशभरात ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची विद्यापीठे सुरू होत गेली. हे एक प्रकारचे मोठे योगदानच होय. शिवाय या लढ्यात जे शहीद झाले, त्यांची कुटुंबे खचून न जाता तेवढ्याच ताकदीने उभी राहिली. उलट त्यांना लढ्यातील बलिदानाबद्दल गर्व वाटू लागला. विद्यापीठ सिनेटमध्ये नामांतराचा ठराव संमत झाला, त्यादिवशी स.भु.च्या मैदानावरून मोठा मोर्चा काढण्यात आला होता. त्याचे नेतृत्व मी करीत होतो. पुढे २७ जुलै १९७८ रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत नामांतर ठराव मंजूर झाला आणि मराठवाडाभर दंगली उसळल्या, असा घटनाक्रम दौलत खरात एक-एक करून उलगडून सांगत होते.
त्यांनी सांगितले, ६ डिसेंबर १९७९ च्या क्रांतीचौकातील सत्याग्रहात मलाही अटक करून हर्सूल जेलमध्ये ठेवण्यात आले. पुढे दलित पँथरच्या माध्यमातून आंदोलने होत राहिली. त्यात माझा हिरीरीचा सहभाग राहत असे. माईसाहेब आंबेडकर यांना अटक झाली. त्यावेळी आम्ही कार्यकर्ते त्यांच्याबोरबर जेलमध्ये राहिलो. किंबहुना हर्सूल जेलमध्ये एक ओपन जेलच उघडून त्याठिकाणी कार्यकर्त्यांना ठेवले जात असे.