- स. सो. खंडाळकर
डिसेंबर १९७९ रोजी क्रांतीचौकात झालेल्या सत्याग्रहाच्या वेळी मंगल खिंवसरा यांनी पोलिसांना खडे बोल सुनावले होते. आजही मंगल खिंवसरा या नावाचा दरारा कायम आहे. महिलांवरील अन्याय- अत्याचाराच्या विरोधात त्या पेटून उठतात. त्यामुळे बलात्काऱ्यांना व पुरुषी मानसिकता जोपासणाऱ्यांना खिंवसरा यांचा एक धाक असतो. नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झुंजार कार्यकर्त्या अशी ओळख असलेल्या खिंवसरा यांनी लोकमतशी संवाद साधला. नामांतर लढ्यात त्या प्रारंभापासून होत्या.
नामांतर लढ्यातील लोकमतचे योगदान अतुलनीय असल्याचे सांगत खिंवसरा म्हणाल्या, ६ डिसेंबरच्या सत्याग्रहासाठी गनिमी काव्याने औरंगाबादेत दाखल झालेल्या स्त्री- पुरुष कार्यकर्त्यांची संख्या अफाट. त्यावेळी मी मिलिंद महाविद्यालयात बी. ए. प्रथम वर्षात शिकत होते. दारिद्र्य, गरिबी आणि शिक्षणाची भूक काय असते, हे मी तिथे पाहिले. मी तशी खात्यापित्या घरची. पण तिथल्या गरिबीमुळे मला वंचित समाजासाठी काम करण्याची ऊर्जा मिळाली. आज मी जे काम करते, त्याची पाळेमुळे नागसेनवनात आहेत.
६ डिसेंबरच्या सत्याग्रहासाठी नागसेनवन परिसर, मिलिंदच्या वसतिगृहात अनेक महिला- भगिनींनी आश्रय घेतलेला. बदनापूरच्या रुपामाय कांबळे मला आजही आठवतात. त्यांच्याकडे एक कपड्याचे गाठोडे. त्याला त्या हातच लावू देत नव्हत्या. विचारलं तर त्या म्हणाल्या, दाखवू का काय आहे त्यात ते! आणि त्या गाठोड्यातला बाबासाहेबांचा फोटो त्यांनी दाखवला. मला काही झालं तरी चालेल, पण बाबाला काही होऊ देणार नाही, ही तिची भावना होती. हा प्रसंग आठवल्यानंतर डोळ्यातून आसवे आल्याशिवाय राहत नाहीत. आपण सर्वांनी मिळून बाबांचे नाव मोठे केले पाहिजे. प्रज्ञा, शील, करुणा, यांचा अंगीकार केला पाहिजे, अशी अपेक्षा मंगल खिंवसरा यांनी व्यक्त केली.