- स. सो. खंडाळकर
वसंतराव नाईक महाविद्यालय तर शंभर टक्के नामांतरवादी होते. किंबहुना ते नामांतर चळवळीचे मुख्य केंद्र बनले होते. याचा मला काल, आज आणि उद्याही अभिमान आहे, अशा शब्दांत या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजाराम राठोड यांनी आपली बांधिलकी जाहीर केली. राजाराम राठोड हे आज वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत.
राठोड यांनी प्रारंभापासूनच पुरोगामी विचारसरणीशी आपली नाळ घट्ट करून ठेवली आहे. वसंतराव नाईक महाविद्यालयातील प्रत्येक प्राध्यापक हा नामांतरवादी होता. इतकेच नाही तर नामांतर लढ्याच्या अग्रभागी होता. दिवंगत प्रा. बापूराव जगताप, कबीरांच्या दोह्यांचे गाढे अभ्यासक प्रा. मोतीराज राठोड, प्रा. सुरेश पुरी, दिवंगत प्रा. जवाहर राठोड आदींनी, तर नामांतर चळवळीत सक्रिय सहभाग घेत नेतृत्वही केले. या सहभागातूनच प्रा. बापूराव जगताप यांनी ‘निळ्या पहाडाच्या कविता’ साकारल्या. मोतीराज आणि जवाहर राठोड यांनीही विपुल साहित्य लिहिले. नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकमतशी बोलताना प्राचार्य राठोड यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला.
१९७७ साली विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काऊन्सिलमध्ये नामांतराचा ठराव मंजूर झाल्यानंतर एक्झिक्युटिव्ह काऊन्सिलमध्ये हा ठराव मी मांडला. त्याला अहमदपूरचे किशनराव देशमुख यांनी अनुमोदन दिले. त्यावेळी शिवाजीराव भोसले नव्हे तर दुसरे भोसले हे कुलगुरू होते. हे सारे रेकॉर्डवर आहे. एमसी आणि ईसीमध्ये ठराव मंजूर झाल्यानंतर नामांतर होईल, असा एक समज; परंतु तो खरा नव्हता. त्याकाळी वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते. विद्यापीठात ठराव मंजूर झाल्यानंतर राज्याच्या विधिमंडळात हा ठराव २७ जुलै १९७८ रोजी मंजूर झाला आणि या ठरावाचे स्वागत होण्याऐवजी दंगली उसळू लागल्या. दलितांच्या घरादारांची राखरांगोळी सुरू झाली. हे सारेच मोठे दु:खदायी. वेदना देणारे होते, असे राजाराम राठोड यांनी नमूद केले. नामांतराच्या निमित्ताने अन्याय-अत्याचाराच्या घटना कानावर येत होत्या. अत्याचारग्रस्तांना मदत व्हावी या भूमिकेतून आमची धडपड चाललेली असायची. अॅड. अंकुश भालेकर यांच्या गावापर्यंत जाऊन आम्ही ही मदत पुवरली होती, अशी आठवण राजाराम राठोड यांनी सांगितली.