औरंगाबाद : राज्यातील औरंगाबादसह कोल्हापूर, शिर्डी विमानतळ नामकरणाचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे आले असून येत्या कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. केंद्र शासनाकडे १३ विमानतळ नामकरणाचे प्रस्ताव आल्याचे त्यांनी नमूद करीत माजी खा. चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire) यांना केंद्रात काय चालले आहे, हे माहिती नसल्याचा टोला लगावला. दोन दिवसांपूर्वी खैरेंनी केंद्रीय नागरी उड्डयनमंत्र्यांना भेटून विमानतळ नामकरणप्रकरणी निवेदन दिले होते.
केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर डॉ. कराड बुधवारी शहरात आले. यावेळी पत्रकारांनी त्यांना विमानतळ नामकरणप्रकरणी विचारले असता ते म्हणाले, हरदीपसिंग पुरी हे नागरी उड्डयनमंत्री असताना विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे करण्याच्या मागणीचा प्रस्ताव आला आहे. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे पत्र दिले. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने पुन्हा नागरी उड्डयन मंत्रालयाला पत्र देऊन देशात किती विमानतळांचे नामकरणाचे प्रस्ताव आहेत, याची विचारणा केली. त्यानंतर प्रत्येक राज्याला उड्डयन मंत्रालयाने पत्र देऊन माहिती मागविल्यानंतर १३ विमानतळांच्या नामकरणाचे प्रस्ताव असल्याचे समाेर आले. यात औरंगाबादसह, कोल्हापूर आणि शिर्डी प्रस्ताव राज्यातून आहेत, अशी माहिती समोर आली. खात्याचे विद्यमान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया असून पूर्ण एकत्रित प्रस्ताव ते समोर ठेवतील, अशी शक्यता आहे. असे डॉ. कराड यांनी सांगितले.
खैरेंनी राज्य शासनाकडे जोर लावावामाजी खा. खैरे यांनी शहराचे नाव संभाजीनगर करा, यासाठी राज्याच्या कॅबिनेट किंवा विधानसभेने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी जोर लावावा. जेणेकरून विमानतळ आणि जिल्ह्याचे नामकरण सोबतच होऊ शकेल. रेल्वे, पोस्ट खात्यांतर्गतदेखील नावाचा बदल तातडीने होण्याची कार्यवाही होईल.