औरंगाबाद : दौलताबाद ( Daultabad ) अर्थात देवगिरी हे शहर मध्ययुगीन कालखंडातील सर्वात समृद्ध शहरांपैकी एक होते. समकालीन प्रवाशांच्या लिखाणातून हे स्पष्ट होते. तत्कालीन कालखंडात बगदाद हे सर्वात सुंदर शहर मानणारे प्रवासी जेव्हा-केव्हा येथे आले तेव्हा दौलताबादच्या प्रेमात पडले ( The name 'Daulatabad' was taken along with 'Baghdad' ), अशी माहिती इतिहासकार डॉ. दुलारी कुरेशी यांनी रविवारी दौलताबाद किल्ल्यात उपस्थित नागरिकांना दिली.
‘अमेझिंग औरंगाबाद’ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या वतीने आयोजित हेरिटेज वॉकमध्ये शहरातील आबालवृद्धांनी सहभाग नोंदवला. जागतिक वारसा सप्ताहनिमित्ताने रविवारी दौलताबाद येथे या हेरिटेज वाॅकचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८ वाजता या वाॅकची सुरुवात झाली.
यावेळी डॉ. रफत कुरेशी व दुलारी कुरेशी यांनी किल्ल्याची निर्मिती, यादवकालीन स्थापत्य कला, साहित्य, संगीत, विविध कला, सोने-मोत्यांची बाजारपेठ तसेच भाषेचा इतिहास (दख्खनी उर्दू आणि मराठी) किल्ल्यावरची तटबंदी, किल्ल्यावर भेट देणाऱ्या परदेशी प्रवाशी इब्न बतुता, फरिस्ता याविषयी सविस्तर माहिती दिली. यानंतर पुरातत्व अधिषण डॉ. मीलनकुमार चावले यांनी उपस्थितांचे स्वागत करून पुरातत्व विभागाच्या वतीने चालू असलेल्या कामाची माहिती दिली. सर्वसामान्य जनतेनेही संवर्धन कामामध्ये सहकार्य करावे, स्वच्छता राखावी, पुरातत्व वास्तूभोवतीचे अतिक्रमण हटविण्यासाठी या विभागास सहकार्य करावे, असे आवाहन केले. यानंतर श्रीकांत उमरीकर यांनी छोट्या गावामध्ये विखुरलेल्या प्राचीन मूर्ती, मंदिरे, बारवा यांच्या जतन व संरक्षणासाठी चळवळीस सहकार्य करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी सहायक पुरातत्वीत डॉ. किशोर सोलापूरकर, संजय रोहणकर, डॉ. कामाजी, मयुरेश खडके, संजय चिट्टमवार, श्रीकांत उमरीकर, किरण वनगुजर, लतीफ शेख, डॉ. संजय पाईकराव, उमेश डोंगरे, प्रमिला कुलकर्णी आदींसह २०० हून अधिक लोक या वॉकमध्ये सहभागी झाले होते.