औरंगाबाद : राजर्षी शाहू महाराजांनी जे बंधारे बांधले त्या कोल्हापुरी बंधाऱ्यांचे नामकरण शाहू बंधारे असे करावे, असा ठराव शनिवारी येथे संमत करण्यात आला.
कॅनॉट प्लेसमधील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ बहुजन सामाजिक सांस्कृतिक मंच व नॉन पोलिटिकल ओबीसी एससी, एसटी सोशल फ्रंट यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद समाज कल्याण समितीचे माजी अध्यक्ष मारोतराव साळवे यांच्या अध्यक्षतेखाली विद्रोही संत कबीर आणि आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी एकमताने टाळ्यांच्या गजरात ठराव मंजूर झाले.
ओबीसींची जातीनिहाय जनगणना तत्काळ करण्यात यावी, खासगी, सहकार, औद्योगिक व न्यायव्यवस्थेत म्हणजे जिथे नोकऱ्या आहेत तिथे आरक्षणाचे तत्त्व लागू करण्यात यावे, विद्यापीठात फुले दांपत्याचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा व संत कबीर यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू करण्यात यावे, औरंगाबाद शहरात महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा व मंडल आयोग लागू करणारे माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांचा पुतळा उभा करण्यात यावा, ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावे व एससींचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा शासन निर्णय मागे घेण्यात यावा आदी ठराव मंजूर करण्यात आले.
उत्तमराव साळवे, महेश निनाळे, निशांत पवार, कीर्ती शिंदे, कीर्तीलता पेटकर, सुनीला क्षत्रिय, कांचन सदाशिवे, विलास चंदने, ॲड डी. व्ही. खिल्लारे, ॲड. महादेव आंधळे, हिरामण चव्हाण, योगेश बन, टी. एस. चव्हाण, प्रा.ज्ञानेश्वर खंदारे आदींची यावेळी भाषणे झाली. रामभाऊ पेटकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. प्राचार्य ग. ह. राठोड, एकनाथ त्रिभुवन, दुर्गादास गुढे, प्राचार्य सुनील वाकेकर, डॉ. रमेश धनेगावकर, प्रा. विलास कटारे, विष्णू वखरे, जयप्रकाश शित्रे, पंडितराव तुपे, रवी तायडे, नरहरी कांबळे, श्रीरंग ससाणे, संदीप घोडके, गजानन सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.