औरंगाबाद : अप्पर तहसील कार्यालयात आवक-जावक विभागात कार्यरत असलेले तलाठी लक्ष्मण नामदेव बोराटे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये एक उपजिल्हाधिकारी, अपर तहसीलदार, नायब तहसीलदारांपासून महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, सहकारी तलाठी आणि विविध लिपिकांच्या नावाचा समावेश असल्याचा दावा मृताच्या नातेवाइकांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणात वरिष्ठांच्या सूचनेनुसार चौकशीला सुरुवात केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी दिली.
अपर तहसील कार्यालयातील तलाठी लक्ष्मण बोराटे यांनी चार पानांची सुसाईड नोट लिहून रविवारी सकाळी आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर नातेवाइकांनी सुसाईड नोटमध्ये नाव असलेल्या महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी दिवसभर ठिय्या दिला होता. सातारा पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी नातेवाइकांची समजूत काढत अंत्यसंस्कार केल्यानंतर चौकशी करून गुन्हा नोंदविण्यात आश्वासन दिले होते. त्यानुसार नातेवाइकांनी रविवारी रात्री उशिरा बोराटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी सकाळी सातारा गावातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह नातेवाइकांनी सातारा पोलीस ठाणे गाठत सुसाईड नोटमध्ये नावे असलेल्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मृताची वृद्ध आईसुद्धा पोलीस ठाण्यात आली होती. या नातेवाइकांनी पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांची पोलीस ठाण्यात भेट घेतली. तेव्हा उपायुक्तांनी चौकशी केल्यानंतर दोषींवर दोन दिवसांत गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिल्याचे नातेवाइकांनी सांगितले. या प्रकरणाच्या तपासावर वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष ठेवून असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
तीन महिन्यांत केवळ २५ दिवस नोकरीअप्पर तहसीलदारांअंतर्गत काम करणारे तलाठी लक्ष्मण बोराटे यांच्या आत्महत्येनंतर महसूल विभाग हादरला आहे. अप्पर तहसील विभागात तीन महिन्यांपूर्वीच ते रुजू झाले, त्यात त्यांनी केवळ २५ दिवसच ड्युटी केली. बहुतांश दिवस ते सुटीवर होते. बोराटे गेल्या नऊ वर्षांपासून संजय गांधी निराधार योजना विभागात काम करत होते. गेल्या आठवड्यातच त्यांच्या आईसह भेटायला आले होते. समस्या काय आहे, याबाबत विचारले असता ते रडत होते. आईने आणि मी विचारल्यानंतरही त्यांनी काहीच सांगितले नाही. त्यांना कुठलीही नोटीस अथवा कुठलीही पगारकपात केली नसल्याचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी सांगितले. तर, महसूल आणि तलाठी संघटनेसाठी खूप धक्कादायक बाब आहे. आम्ही सर्व संभ्रमात आहोत. पोलीस घटनेचा तपास करतील, असे तलाठी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी यांनी सांगितले.
नातेवाइकांकडे प्राथमिक चौकशीलक्ष्मण बोराटे यांच्या नातेवाइकांकडे पोलिसांनी सोमवारी चौकशी केली. या चौकशीत बोराटे यांना देण्यात येत असलेल्या त्रासाविषयी माहिती जाणून घेतली. तसेच पोलीस सुसाईड नोटमध्ये समावेश असलेल्या नावांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी मंगळवारी करणार आहेत. या चौकशीत पोलीस संबंधितांचे मोबाइल फोन, व्हाॅट्सॲप चॅटचीही तपासणी करणार आहेत.
तपास उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडेसातारा पोलीस ठाण्यात लक्ष्मण बोराटे यांच्या आत्महत्येप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याचा तपास हवालदार देवीदास राठोड यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र, पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी हा तपास उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे देण्याच्या सूचना ठाणेदारांना केल्या. त्यानुसार हा तपास उपनिरीक्षक संभाजी गोरे यांच्याकडे देण्यात आला आहे. उपनिरीक्षक गोरे यांना भेटीसाठी बोलावून उपायुक्तांनी तपासाच्या संदर्भात सूचना दिल्याचेही समजते.