औरंगाबाद : पुसला जात असलेला इतिहास नव्या पिढीसमोर नेण्याची गरज आहे. काँग्रेसचा ( Congress ) विचार संपवण्याचा प्रयत्न होतोय. या देशाची लोकशाही, एकात्मता व संविधान संपवण्याचा प्रयत्न होत आहे. फाळणी दिन साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. धर्माच्या नावाने विभागणी करण्याचे प्रयत्न होत आहेत. नाना पटोले ( Nana Patole ) मोदींना घाबरत नाही, तर आणखी कुणाला घाबरण्याचे कारण नाही, असे सांगत आता ‘फिरसे काँग्रेस’ असा नारा सोमवारी येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. ते तापडिया नाट्य मंदिरात ‘व्यर्थ न हो बलिदान’ या कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करताना बोलत होते. ( Nana Patole is not afraid of Modi, there is no reason to be afraid of anyone else)
ओबीसींना अधिकार देणारा तू कोण? ते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले, असा टोला पट़ोले यांनी मारताच टाळ्यांचा कडकडाट झाला. इकडे दाढीवाले झेंडा फडकवताहेत आणि चीन भारताची जमीन बळकावताहेत. गोरे गेले, पण हे परवडत नाही, असे लोक म्हणताहेत. मी थोडे दिवस राहिलो त्यांच्याबरोबर. हे सरकार या शेतकऱ्यांशी चर्चा करायला तयार नाही, अशी टीका पटोले यांनी केली.
सकाळी १०-३० वाजताच्या या कार्यक्रमात दुपारी १२-३९ वा. तापडिया नाट्य मंदिरात पट़ोले यांचे आगमन झाले. तत्पूर्वी शहरातील महामानवाच्या पुतळ्यांना म़ोटारसायकल रॅलीव्दारे त्यांनी अभिवादन केले. तापडिया नाट्य मंदिरात स्वातंत्र्य लढ्याची चित्रफीत दाखवण्यात आली. या कार्यक्रमाला एकही मंत्री उपस्थित नसल्याची चर्चा ह़ोती. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. वारंवार सूचना करूनही मंचावरची गर्दी कमी होत नव्हती. शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
मंचावर शिवाजीराव मोघे, अ.भा. सचिव संपतकुमार, चंद्रकांत हंडोरे, अतुल ल़ोंढे, एम. एम. शेख, आमदार कैलास गोरंट्याल, आ. राजेश राठोड, संजय राठोड, मीना शेळके, उत्तमसिंग पवार, सुभाष झांबड, अनिल पटेल, सरोज मसलगे, विलासबापू औताडे, डॉ. जितेंद्र देहाडे, नामदेव पवार, महेंद्र रमंडवाल, निमेश पटेल, मुजफ्फर खान पठाण, नंदकिशोर वजन, डॉ. अरुण शिरसाट, अभय छाजेड, सय्यद अक्रम, सीमा थोरात, पापा मोदी, सुरेखा पानकडे आदींची उपस्थिती होती.
'त्या' घोषणा मी ऐकल्याच नाही; बीड जिल्ह्यातील प्रकारावर मंत्री भागवत कराड यांचे पांघरूण
जागेवर जाऊन सत्कार...स्वातंत्र्य सैनिक समोरच्या पहिल्या दोन रांगांमध्ये बसलेले होते. थेट त्यांच्यापर्यंत प़ोहोचून नाना पटोले यांनी त्यांचा सत्कार केला. शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह दिले व त्यांच्या पाया पडून अभिवादन केले. ‘व्यर्थ न हो बलिदान’ हा आजचा नववा कार्यक्रम होता. सध्याचे सरकारने खोटा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. लोकांसमोर खरा इतिहास मांडण्यासाठी हा कार्यक्रम असल्याचे यावेळी सांगण्यात आले. स्वातंत्र्य सैनिक सांडू पाटील कराळे यांनी मनोगत व्यक्त केले. देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी काँग्रेसच्या झेंड्याखाली यावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले. स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य म्हणून माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांनी विविध मागण्या सादर केल्या. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. कल्याण काळे यांनी आभार मानले.