छत्रपती संभाजीनगर: महाविकास आघाडीची उद्या बैठक आणि पत्रकार परिषद होणार आहे. या बैठकीला नाना पटोलेंना आमंत्रण नसेल, त्यांचा पदोपदी अपमान महाविकास आघडीत केला जात आहे. हा अपमान सहन करण्याऐवजी त्यांनी घरवापसी करावी, असा सल्ला शिंदे सेनेचे प्रवक्ते आ.संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिला.
महायुतीचे रखडलेल्या जागा वाटप कधी जाहिर होणार, या प्रश्नाचे उत्तर देताना आ. शिरसाट म्हणाले की, मुख्यमंत्री आज रामटेक मध्ये आहेत. तेथे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची बैठक आणि चर्चा झालेली आहे. आता उद्या पुन्हा महायुतीचे नेते एकत्र बसून उर्वरित सीटचे जागा वाटप करण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद, नाशिकची जागा शिवसेनेचीच आहे. नाशिक येथे हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आणि पक्षाचे संघटन आहेत. असे असताना आमच्या जागा देण्याचा प्रश्नच नाही. या दोन्ही जागांचा तिढा सुटला असल्याचे ते म्हणाले. झटपट सर्वेक्षणाच्या नावाखाली भाजपकडून शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे का,असे विचारले असता शिरसाट म्हणाले की, या सर्वेक्षणातून हे स्पष्ट होते की, महायुतीचाच उमेदवार निवडून येणार आहे.
खडसे, बबनराव घोलप यांच्यासह अनेक नेत्यांची घरवापसी होत आहे. पुढील आठ दिवसांत आणखी काही आमदार महायुतीत सामील होणार असल्याचे आ. शिरसाट यांनी सांगितले. बाळासाहेब थोरात यांनीही खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. खरे तर संजय राऊत हे एका छोट्या पक्षाचे असताना ते महाविकास आघाडीचा प्रवक्ता असल्यासारखे बोलतात. राऊत यांची अवस्था खूप वाईट होणार असल्याचेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये सभेची तारीख ठरल्याकडे लक्ष वेधले असता शिरसाट म्हणाले की, त्यांच्या सभांना प्रतिसाद किती मिळतो,यावरूनच त्यांचे उमेदवारांचे काय होईल हे स्पष्ट होईल. अमोल किर्तीकर यांना ईडीने नोटीस दिली असली तरी इडी च्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नावलीला समर्पक उत्तरे दिल्यास काहीच त्रास होत नाही. ईडीच्या नोटीस या राजकीय दबावातून पाठविल्या जातात हे सर्व खोट असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज ठाकरे यांनी महायुतीत यावेमनसेचा उद्या पाडव्यानिमित्त मुंबईत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात ठाकरे हे त्यांची भूमिका मांडतील.पण त्यांनी महायुतीत यावे, अशी आमची अपेक्षा असल्याचे शिरसाट म्हणाले.