औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील एकेरी मार्गावर लवकरच विजेवर रेल्वे धावणार आहे. दुहेरीकरणाचे काम करण्यासोबतच एप्रिलपासून एकेरी मार्गावर विद्युतीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी नांदेड विभागात ‘फूट बाय फूट’ सर्वेक्षणाला १२ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे.
नांदेड विभागात रेल्वेचे इंजिन नादुरुस्तीच्या घटनांचे प्रमाणही अधिक आहे. इंजिन नादुरुस्तीनंतर या मार्गावरील रेल्वेची वाहतूक ठप्प होते. इंजिन दुरुस्त होणे अथवा दुसरे इंजिन येण्यात बराच वेळ जातो. त्यामुळे तासन्तास रेल्वे वाहतूक खोळंबते. गेल्या अनेक वर्षांपासून दुहेरीकरणासह विद्युतीकरणाची मागणी आहे. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणानंतरच विद्युतीकरण होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती; परंतु दुहेरीकरणाआधीच एकेरी मार्गावर विजेवर रेल्वे चालविण्यासाठी ‘दमरे’कडून जोरदार तयारी सुरू आहे.
नांदेड विभागातील एकेरी रेल्वे मार्गावर एप्रिल २०१८ पासून विद्युतीकरणाचे काम सुरू होणार असून, विद्युतीकरणाच्या कामाने इंजिन नादुरुस्तीच्या घटनांना कायमस्वरूपी आळा बसेल, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांनी डिसेंबरमध्ये औरंगाबाद दौर्यात म्हटले होते. त्यानंतर ११ जानेवारी रोजी नांदेड येथे खासदारांची बैठक पार पडली. यावेळी महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनीही विद्युतीकरणाचे काम सुरू होणार असल्याचे नमूद केले. या बैठकीच्या दुसर्याच दिवशी १२ जानेवारीपासून नांदेड विभागात विद्युतीकरणासाठी ‘फूट बाय फूट’ सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली.
७० कि.मी.चे सर्व्हे पूर्ण या सर्वेक्षणात प्रत्येकी ५ जणांचे ४ पथके काम करीत आहेत. यामध्ये आतापर्यंत मुदखेड ते पूर्णा हे जवळपास ७० कि.मी. अंतराचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर कामाचे टेंडर्स काढले जातील. या सर्वेक्षणाच्या आधारे रेल्वे पेगिंग प्लॅन बनविण्यात येईल. तसेच विद्युत पुरवठा करण्यासाठी कंपनीला सबस्टेशन बनविणे, दुरुस्ती डेपो बनविणे यासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होईल, असे ‘दमरे’च्या नांदेड विभागातर्फे सांगण्यात आले.