परळी (बीड) : प्रायोगिक तत्त्वावर शनिवारपासून नांदेड-हुबळी दरम्यान परळी-पंढरपूर मार्गे नवीन साप्ताहिक विशेष रेल्वे सुरू झाली आहे. या रेल्वे गाडीचे शनिवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास परळी रेल्वे स्थानकावर संघर्ष समितीच्यावतीने स्वागत करण्यात आले.
चीफलोको इन्स्पेक्टर राजेन्द्र कांबळे, लोको पायलट अभिषेक कुमार , अमीत कुमार, पंढरपूरला जाणारे प्रवासी बंडगर यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी परळी रेल्वे संघर्ष समितीचे सत्यनारायण दुबे, सतीश बियाणी , अश्विन मोगरकर, रमेश साखरे, श्याम दैठणकर, पदमकार उखलीकर, कैलास डुमने, आदींची उपस्थिती होती.
नांदेड-हुबळी रेल्वेमुळे तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूर, गोकर्णा, मुरुडेश्वर येथील मंदिरांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी विशेष सोय झाली आहे. तसेच दूधसागर धबधबा, गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांना देखील अनुकूलता होणार आहे. अशी माहिती परळी रेल्वे संघर्ष समितीचे श्री सत्यनारायण दुबे यांनी दिली. तर ही गाडी दररोज सुरू करावी अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे करणार असल्याची माहिती अश्विन मोगरकर यांनी दिली. तसेच हा निर्णय स्वागतार्ह असून आम्हाला पंढरपूरला जाण्याची सोय झाली आहे, ही गाडी नियमित करावी अशी प्रतिक्रिया अंजनगाव अमरावती येथील प्रवासी सागर लोडम यांनी दिली.
असा आहे रेल्वेचा मार्गनांदेड-हुबळी रेल्वे नांदेड येथून दर शनिवारी दुपारी 2.10 वाजता निघून पूर्णा , परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ मार्गे पुढे लातूर रोड, लातूर, बार्शी , पंढरपूर, सांगोला, मिरज, घटप्रभा, बेळगाव, लोंढा जंक्शन, धारवाड स्थानकावरून हुबळी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता पोहचेल. तर हुबळी येथून दर रविवारी सकाळी 11.15 ला निघून त्याच मार्गाने परळी वैजनाथ येथे दूसऱ्या दिवशी सकाळी 3.45, गंगाखेड 5.05, परभणी 5.45 पूर्णा 6.35 तर शेवटी नांदेड येथे सकाळी 8 वाजता पोहोचेल आहे.