VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 06:06 PM2024-10-17T18:06:49+5:302024-10-17T18:07:58+5:30
Nanded Loksabha By election : इम्तियाज जलील यांनी नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
Nanded Loksabha By election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. विधानसभेसोबतच निवडणूक आयोगाने नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अकाली निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. काँग्रेसने या जागेवर वसंतराव यांचे पुत्र रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, त्यांच्यासमोर आता एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी दंड ठोपटले आहेत.
इम्तियाज जलील यांनी नांदेड लोकसभा (Nanded Loksabha election) पोटनिवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. या पोटनिवडणुकीसोबतच ते छत्रपती संभाजीनगरमधून विधानसभा निवडणूकदेखील लढवणार आहेत. लोकमतशी बोलताना इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली. जलील म्हणाले की, 'नांदेडमधून लोकसभा लढण्याची संधी आलेली आहे. संधी असताना का प्रयत्न करायचे नाही? लोकांमध्ये रोष पाहायला मिळतोय. मी महाराष्ट्रातील एकमेव मुस्लिम खासदार होतो, मला पाडण्यासाठी या लोकांनी कशी मेहनत घेतली, हे सर्वांना माहिती आहे. मी ही लोकसभा पोटनिवडणूक लढवावी, अशी आमच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. त्यांनी ती इच्छा आमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांना बोलून दाखवली आहे.'
'शिवाय माझीही निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. एमआयएम महाराष्ट्रात आल्यानंतर सर्वात जास्त प्रतिसाद नांदेडमधून मिळाला होता. आम्हाला संधी आल्यानंतर आम्ही दिवंगत खासदाराबाबत का विचार करू? आम्ही आमच्या पक्षाच विचार करणार आहोत. पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर निर्णय सोडला आहे. चाचपणी करा आणि लढवा, असे आम्हाला पक्षाने सांगितले आहे. आमचे नेते ओवेसी जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. मी कुठून लढणार हे ओवेसीसाहेब ठरवणार आहेत. काही जागांवर ओवेसी जातीने लक्ष घालत आहेत,' अशी माहिती जलील यांनी यावेळी दिली.
काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी
खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसोबतच 20 नोव्हेंबर रोजी नांदेड लोकसभेच्या जागेसाठी मतदान होणार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपकडून अद्याप या जागेसाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही.