नांदेड: महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने १८ लाखांचा खर्च केला. तर भाजपाने ४० लाख ८८ हजार रुपये पक्षाचा खर्च सादर केला आहे. निवडणुकीनंतर महापालिका निवडणूक विभागाकडे काँग्रेससह राष्टÑवादी, शिवसेना, भाजपा, जनता दल आदी पक्षांनी आपला खर्च सादर केला आहे. त्यामध्ये ही माहिती पुढे आली आहे.
नांदेड महापालिकेच्या २० प्रभागातील ८१ वॉर्डासाठी आॅक्टोबर २०१७ मध्ये निवडणूक घेण्यात आली. ही निवडणूक प्रारंभी अटीतटीची वाटली असली तरी निकालानंतर मात्र ही निवडणूक काँग्रेसने पूर्णपणे एकतर्फी ठरविली. ८१ पैकी ७३ जागा मिळवत काँग्रेसने महापालिकेत सुस्पष्ट असे बहुमत मिळविले. तर काँग्रेसला आव्हान देणार्या भाजपाला ६ जागा मिळाल्या. शिवसेना एका जागेवर आटोपली तर एमआयएम आणि राष्ट्रवादीला आपले खातेही उघडता आले नाही. निवडणुकीनंतर या पक्षांनी आपला खर्च सादर केला आहे. या खर्चात काँग्रेस पक्षाने महापालिका निवडणुकीसाठी १८ लाख ११ हजार ९८९ रुपये खर्च केल्याचे दाखविले आहे. त्यामध्ये जाहीर सभा, जाहिराती, स्टार प्रचारकांचा खर्च आदी बाबींचा समावेश आहे. भारतीय जनता पार्टीने सादर केलेल्या पक्षीय खर्चात ४० लाख ८८ हजार २६२ रुपये खर्च झाल्याचे नमूद केले आहे. शिवसेनेही दाखविलेल्या खर्चामध्ये ७ लाख १ हजार ५५३ रुपये आणि राष्ट्रवादी पक्षाने ७ लाख ४८ हजार ७ रुपये खर्च झाल्याचे स्पष्ट केले आहे.
जनता दलानेही महापालिका निवडणुकीसाठी ४५ हजार ९०० रुपये खर्च दर्शविला आहे. नांदेड महापालिका निवडणुकीत अनामत रकमेतून जवळपास १५ लाख रुपये प्राप्त झाले. या निवडणुकीत सर्वसाधारण उमेदवारांसाठी पाच हजार तर अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी तसेच महिला उमेदवारांसाठी अडीच हजार रुपये अनामत रक्कम होती. आवश्यक तितकी मते न मिळाल्यामुळे अनामत रक्कम जप्त करण्यात आली. यातून १५ लाख रुपये महापालिकेला मिळाले. दरम्यान, नांदेड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी महापालिका प्रशासनाला जवळपास तीन कोटी रुपये खर्च करावा लागला. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी २ कोटी १० लाख रूपये खर्च झाला होता. यात भत्ते व मानधनासाठी जवळपास १ कोटी रुपये खर्च झाले. राज्यात पहिल्यांदाच नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर झाला होता. तो यशस्वी झाला. नांदेड महापालिकेच्या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक झाल्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने नांदेड महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह त्यांच्या सर्व अधिकारी-कर्मचार्यांचे कौतुक केले.
व्हीव्हीपॅटसाठी दोन लाखांचे देयक मनपाकडेमहापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ७० व्हीव्हीपॅट मशीन आणल्या होत्या. त्यापैकी प्रभाग २ मध्ये ३७ मतदान केंद्रांवर वापरण्यात आल्या. या मशीनच्या बॅटरी व पेपर रोलसाठी हैदराबादच्या ईसीआयएल कंपनीने महापालिकेला दोन लाखांचे देयक दिले आहे. हे देयक अदा करावे, अशी मागणी त्यांनी केलीं आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाने कोणतेही आदेश अथवा निर्देश दिले नसल्याने देयक देण्याबाबत महापालिकेने नकार दिला आहे. देयकासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे संपर्क साधावा, असेही ईसीआयएल कंपनीला कळविले आहे.