लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे २२ वे महापौर म्हणून रविवारी सेनेचे नंदकुमार घोडेले सर्वाधिक ७७ मते मिळवून महापौरपदी विराजमान झाले. भाजपचे विजय औताडेही तेवढेच मताधिक्य घेऊन उपमहापौरपदी अरूढ झाले. सेना-भाजप युतीकडे फक्त ५० मते असताना त्यांनी छोट्या-छोट्या पक्षांना सुरुंग लावत, अपक्षांच्या मदतीने विजयाचा कळस चढविला. महापालिकेच्या इतिहासात आजपर्यंत एवढे मोठे मताधिक्य कोणत्याच उमेदवाराला मिळाले नाही, हे विशेष. महापालिकेवर पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीचा भगवा फडकताच हजारोंच्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाक्यांची आतषबाजी करून दिवाळी साजरी केली.महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या निमित्ताने मागील एक महिन्यापासून सेना-भाजप युतीमध्ये नाट्यमय ‘घडामोडी’ सुरू होत्या. त्यामुळे यंदा निवडणुकीत महापालिकेवर भगवा फडकतो किंवा नाही, अशी शक्यता निर्माण झाली होती. सेनेला महापौरपद मिळू नये म्हणून जोरदार कुरघोड्या सुरू होत्या. आपल्या राजकीय अनुभवाचा फायदा घेत सेनेनेही ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार घोडेले यांना महापौरपदाची उमेदवारी देऊन कुरघोड्यांना अंकुश लावला.रविवारी सकाळी १० वाजेपासूनच महापालिकेचा परिसर गजबजला होता. सर्वप्रथम एमआयएमचे नगरसेवक महापालिकेत दाखल झाले. त्यापाठोपाठ शिवसेना-भाजप युतीचे नगरसेवक एका बसमध्ये फेटे बांधून महापालिकेत दाखल झाले. यावेळी घोषणा देत युतीचे नगरसेवक सभागृहात दाखल झाले. १०.४० वाजता पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांचे महापालिकेत आगमन झाले. ठीक ११ वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. सभागृहात जाण्यापूर्वी सर्व नगरसेवकांचे मोबाइल जप्त करण्यात आले होते. प्रारंभी महापौरपदाची निवडणूक घेण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा वेळ देण्यात आला. कोणीही उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. सेनेकडून नंदकुमार घोडेले, एमआयएमकडून अब्दुल रहीम नाईकवाडी, काँग्रेसतर्फे अय्युब खान निवडणूक रिंगणात होते. पीठासन अधिका-यांनी हात उंचावून मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी युतीचे घोडेले यांना सभागृहात उपस्थित ११३ सदस्यांपैकी ७७ नगरसेवकांनी मतदान केले. राष्टÑवादी काँग्रेसच्या मुल्ला सलीमा बेगम उशिरा आल्याने त्यांना महापौर निवडणुकीत भाग घेता आला नाही. एमआयएमचे नाईकवाडी यांना २५ मते मिळाली. काँग्रेसचे अय्युब खान यांना ११ मते पडली. घोडेले सर्वाधिक मतांनी विजयी झाल्याची घोषणा पीठासन अधिका-यांनी केली.युतीच्या नेत्यांची हजेरीसकाळपासूनच युतीचे सर्व नेतेही महापालिकेत दाखल झाले होते. त्यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिका-यांनी पदभार ग्रहण केला. यावेळी खा. चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, सेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर,डॉ. भागवत कराड, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी उपमहापौर प्रशांत देसरडा, सभापती गजानन बारवाल, अनिल मकरिये, माजी नगरसेवक दामूअण्णा शिंदे आदींची उपस्थिती होती.
नंदकुमार घोडेले शहराचे २२ वे महापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 1:25 AM