औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या उभारणीसाठी लक्षणीय योगदान देणाऱ्या लेखक- कार्यकर्त्यांच्या साहित्याचा व संस्थात्मक कार्याचा गौरव करण्यासाठी परिषदेतर्फे जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचा सहावा जीवनगौरव पुरस्कार न्या. नरेंद्र चपळगावकर यांना जाहीर झाल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.न्या. चपळगावकर यांचा तरुणपणीच मराठवाडा साहित्य परिषदेशी संबंध आला. तेव्हापासून आजपर्यंत ते साहित्य परिषदेशी जोडलेले आहेत. १५ वर्षांहून अधिक काळ ते विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष होते. मराठवाडा साहित्य परिषदेसोबतच ते महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील वाङ्मय व्यवहाराशी निगडित असलेल्या अनेक संस्थांचे सभासद आहेत. साहित्य क्षेत्रातील आणि मराठवाडा साहित्य परिषदेतील त्यांचे योगदान लक्षात घेता जीवनगौरव पुरस्कारासाठी त्यांची एकमताने निवड झाली असून, लवकरच पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येईल, असे ठाले यांनी सांगितले.चौकट :हिंगोली येथे वर्धापन दिनयावेळी ठाले यांनी मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे राबविण्यात येणाºया उपक्रमांबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, परिषदेच्या शाखेसाठी उस्मानाबाद येथे १० हजार चौरस फूट जागेवर संत गोरोबाकाका सभागृह बांधण्याचे काम तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच नांदेड येथे शाखेला जागा मिळण्यासाठी सतत प्रयत्न केले जात असून, तेथील महानगरपालिकेने जागा देण्याची घोषणा केली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचा वर्धापन दिन यावर्षी दि. २९ सप्टेंबर रोजी हिंगोली येथे साजरा करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.चौकट :आदिलाबादकडे देणार लक्षतेलंगणा राज्यातील आदिलाबाद हे शहर पूर्वी मराठवाड्याचाच भाग होते. भाषावार प्रांतरचनेमुळे ते तेलंगणात गेले आणि मराठीशी असलेली नैसर्गिक नाळ तुटत गेली. आज या गावाची ६६ टक्के लोकसंख्या मराठी भाषक असून, तिथे मराठी भाषक, शैक्षणिक व सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषद प्रयत्नशील आहे. तेथे कविसंमेलन घेण्यात येऊन विविध उपक्रमांची सुरुवात करण्यात येईल, असेही ठाले यांनी सांगितले.
नरेंद्र चपळगावकर यांना जीवनगौरव पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:48 PM