औरंगाबाद : ‘ नरेंद्र.... देवेंद्र, बेरोजगारीचे केंद्र, रोजगार आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, कामाची नाही आमची डिग्री, फडणवीस सरकार बेफिक्री, अशा लक्षवेधी घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज दुपारी पदव्यांचीच अंत्ययात्रा काढण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख व प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन करण्यात आले.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ही अंत्ययात्रा सुरू झाली. यात खरोखरची तिरडी तयार करण्यात आली होती. त्यावर पदव्या ठेवण्यात आल्या होत्या. जोरदार घोषणाबाजी करीत ही तिरडी विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत आणण्यात आली. तेथे सामान्य प्रशासन उपायुक्त वर्षा ठाकूर यांना निवेदन सादर करण्यात आले. राज्यभर विभागीय आयुक्त कार्यालय असलेल्या शहरांमध्ये सध्या असे आंदोलन सुरू आहे. नाशिक झाले. नागपूर, अमरावती आदी ठिकाणीही ते केले जाईल, असे मेहबूब शेख यांनी सांगितले.
औरंगाबाद शहराध्यक्ष दत्ता भांगे, कार्याध्यक्ष कय्युम शेख, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, कार्याध्यक्ष रहिम पटेल, अक्षय पाटील, डॉ. कपिल झोटिंग, बीडचे जिल्हाध्यक्ष जयसिंह सोळंके, परभणीचे जिल्हाध्यक्ष शांतस्वरूप जाधव, जालन्याचे प्रभारी आशिष मेटे, औरंगाबादचे प्रभारी कुमार वाळके, विलास मगरे, अभिषेक देशमुख, मयूर सोनवणे, चंदन पाटील आदींच्या सह्यांच्या या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत :दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मिती करावी व त्याची अधिकृत माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर जाहीर करावी, सर्व रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात, बेरोजगारांना नोकरी मिळेपर्यंत बेरोजगार भत्ता द्यावा, महापोर्टल, महापरीक्षा या यंत्रणांद्वारे होणाऱ्या परीक्षा बंद करून शासकीय विभागामार्फत परीक्षा घेण्यात याव्यात, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत खाजगी संस्थांची खैरात बंद करून हा निधी रोजगार निर्मितीकरिता वापरावा, विविध महामंडळांच्या योजनांमध्ये तरुण उद्योजकांना लघुउद्योग स्थापनेसाठी अर्थसाह्य द्यावे. भाजप सरकारच्या काळातच बेरोजगारीचा दर ६.१ टक्के झाला आहे. एनएसओच्या सर्व्हेनुसार गेल्या पाच वर्षांत दोन कोटी तरुणांनी नोकऱ्या गमावल्या आहेत.