औरंगाबाद : केंद्र सरकार तसेच राज्य सरकारमधील नेत्यांमध्ये राजकीय धमक नाही. त्यापैकी कोणी जातीचे, तर कोणी धर्माचे नेतृत्व करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकीय नेते नाहीत. ते धार्मिक गटाचे नेते आहेत. त्यांच्यात राजकीय नेतृत्वाची धमक नाही. त्यामुळे कोरोनासारख्या महामारीतून बाहेर येण्यासाठी या नेत्यांकडे दृष्टी नाही, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केला.
अकोला येथील दौरा आटोपून प्रकाश आंबेडकर शुक्रवारी औरंगाबादेत आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, देशात कोरोना आता आटोक्यात आला आहे. डॉक्टर्स, वैज्ञानिकांच्या परिश्रमांमुळे कोरोनावर आपण मात केली आहे, हा संदेश सरकारने दिला पाहिजे होता; पण हे वास्तव लोकांसमोर आणण्याची दृष्टी राजकीय नेत्यांमध्ये नाही. केवळ पाच टक्के लोकांमुळे देशातील ९५ टक्के लोकांना वेठीस धरणे योग्य नाही. या पाच टक्के लोकांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या उपचाराची योग्य ती काळजी सरकारने घ्यावी.
मोफत अन्नधान्य वाटपाची केवळ घोषणा लॉकडाऊनच्या चक्रात केंद्र सरकार, राज्य सरकार स्वत:हून अडकलेले आहे. बाहेर पडण्याचा रस्ता त्यांना दिसत नाही. म्हणून सर्वसामान्य माणसांना माझे आवाहन आहे की, या चक्रव्यूहात अडकलेल्या केंद्र आणि राज्य सरकारला रस्ता दाखवण्याची गरज आहे. उद्या ईद आहे. दोन तारखेला रविवार आणि तीन तारखेला रक्षाबंधन आहे. सर्व लहान-मोठ्या व्यावसायिकांनी आपली दुकाने १ तारखेपासून उघडावीत. लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. २० लाख कोटींची जशी घोषणा झाली, तशी ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य वाटपाचीही घोषणा झाली आहे.
सर्वसामान्यांनी लॉकडाऊनच्या अगोदरचे जनजीवन सुरू करावेदेशातील अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याची जबाबदारी सरकारची नाही, तर सर्वसामान्य माणासांची आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आवाहन करीत आहे की, लॉकडाऊन आता मान्य करायचे नाही. स्वत:ला वाचवण्यासाठी शासनाने दिलेल्या गाईडलाईनप्रमाणे आपले जनजीवन लॉकडाऊनच्या अगोदर जसे होते तसे सुरू करावे. रक्षाबंधनच्या दिवशी तरी शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या बस सुरू कराव्यात. लोकांना त्यांचे सण साजरे करू द्या. आमचा लॉकडाऊनला पाठिंबा नाही, हे दर्शविण्यासाठी आपण ज्या झेंड्याला मानत असाल, तो झेंडा आपल्या घरावर फडकवा. तिरंगा फडकवला, तर अधिक उत्तम. आम्हाला आता लॉकडाऊनमधून बाहेर पडायचे आहे, हे यातून निर्देशित करावे.