लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार, हे साहित्यप्रेमींना कळून चुकले होतेच. पण शुक्रवारी मराठवाडा साहित्य परिषद येथे झालेल्या बैठकीत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिकच्या लोकहितवादी मंडळाकडून आलेल्या प्रस्तावावर औपचारिक शिक्कामोर्तब केले आणि ९४ व्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान नाशिकला मिळाल्याचे जाहीर केले. मार्च महिन्याच्या अखेरीस गोखले एज्युकेशन सोसायटीच्या परिसरात साहित्य संमेलन होणार आहे.
ठाले पाटील म्हणाले की, सरहद संस्थेने मे महिन्यात साहित्य संमेलन घेण्याचे सांगितले होते, परंतु महामंडळाचे आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च असे आहे. प्रत्येक वर्षीचे अनुदान त्याच वर्षी वापरले गेले पाहिजे, असे वाटते. त्यामुळे पुन्हा अनुदानाचा प्रश्न निर्माण होऊ नये, हे देखील प्रस्ताव नाकारण्याचे एक कारण होते. याशिवाय कोरोनामुळे साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी दिल्ली सुरक्षित ठिकाण नाही. त्यामुळे दिल्लीला संमेलन घेण्यास महामंडळ उत्सुक नव्हते.
सहस्रचंद्र दर्शनाची चर्चा तथ्यहीनछगन भुजबळ, शरद पवार आणि त्यांचे सहस्रचंद्रदर्शन यांचा सध्यातरी साहित्य संमेलनाशी काहीही संबंध नाही. पुढे जर अशी काही वेळ आली तर तसा विचार करू, असे स्पष्टीकरण ठाले पाटील यांनी दिले. राजकीय नेत्यांना भूमिकेशिवाय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर स्थान दिले जाणार नाही, हे आम्ही मागच्या साहित्य संमेलनाच्यावेळीच सांगितले होते. तीच भूमिका आमची यावेळीही कायम राहील, असेही त्यांनी ठासून सांगितले.
२४ तारखेला ठरणार संमेलनाध्यक्ष२३ जानेवारी रोजी नाशिक येथे संमेलन मार्गदर्शन समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत संमेलनाच्या आयोजनाविषयी चर्चा होईल. तसेच दि. २४ रोजी नाशिक येथेच एक बैठक होणार असून, यामध्ये साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाची रचना आणि संमेलनाध्यक्ष याचा निर्णय जाहीर केला जाईल.
तिसऱ्यांदा मान नाशिकमध्ये याआधी १९४२ व २००५ असे दोन वेळा संमेलन भरविण्यात आले. तिसऱ्यांदा संमेलन आयोजनाचा मान नाशिकला मिळणार आहे.
स्वागताध्यक्षपदी भुजबळ? मार्चच्या १९, २० व २१ तारखेला संमेलन होण्याची चिन्हे आहेत. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि माजी आमदार हेमंत टकले यांच्या नावांची चर्चा आहे.