- तारेख शेख
कायगाव (जि. औरंगाबाद) : नाशिक जिल्ह्यातील धरणसमूहाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने गोदावरी यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच दुथडी भरून वाहिली.
मंगळवारी सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास गोदावरीचेपाणीऔरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटर असणाऱ्या जुने कायगावला धडकले. पाणी जुने कायगावला पोहोचले की जायकवाडी धरणात पाण्याच्या आवकाची नोंद सूरु होते. नाशिक जिल्ह्यातील धरणसमूहाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने शनिवारपासून गोदावरीला पाणी येण्याची या भागातील नागरिक वाट पाहत होते.
औरंगाबाद जिल्ह्यात असणाऱ्या गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पर्यंत एकही समाधानकारक पाऊस न झाल्याने नदीचे पात्र मंगळवार सकाळपर्यंत ठिकठिकाणी कोरडे पडले होते. अनेक ठिकाणी नदीपात्रात पाण्याचा खंड पडला होता. मात्र आज सकाळीच गोदावरी भरून वाहिल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.