छत्रपती संभाजीनगर : शांतिब्रह्म संत श्री एकनाथ महाराज औरंगपुऱ्यातील तत्कालीन विठ्ठल रुख्माई मंदिरात मुक्काम करत. येथील देव-देवतांच्या मूर्तींची पूजा करत. खुद्द नाथ महाराजांनी ज्या मूर्तींची पूजा केली, त्या देव-देवतांच्या मूर्ती आजही आहेत. एकनाथ महाराजांचे समाधी मंदिर पैठणमध्ये, तर महाराजांच्या नावाने छत्रपती संभाजीनगरातील औरंगपुरा परिसरात ‘नाथ मंदिर’ आहे. याच मंदिरात ४५० वर्षांपूर्वीच्या काही मूर्तीचे दर्शन घेता येते.
आताच्या नाथ मंदिराचे नाव ४५० वर्षांपूर्वी विठ्ठल रुख्माई मंदिर असे होते. येथे काळ्या पाषाणातील विठ्ठल-रुख्मिणीच्या मूर्ती होत्या. तसेच विजय पांडुरंगाची (बालाजी) वेगळी मूर्ती होती. हे गोसावी घराण्याचे कुलदैवत होय. एकनाथ महाराजांनी दौलताबादेतील देवगिरीचे किल्लेदार असलेले सद्गुरू जनार्दन स्वामी यांना गुरू मानले होते. त्यांनीच एकनाथ महाराजांना सुलीभंजन पर्वतावर श्रीदत्तात्रेयांचे दर्शन घडविले होते. एकनाथ महाराज गुरूंच्या दर्शनाला पैठणहून येताना व जाताना औरंगपुऱ्यातील तत्कालीन विठ्ठल रुख्मिणी मंदिरात मुक्कामी थांबत. तेव्हा मंदिर लाकडी वाड्यात होते.त्यावेळेस विठ्ठल-रुख्माईची काळ्या पाषाणातील मूर्ती व तसेच विष्णू भगवंतांची मूर्ती, लक्ष्मीयंत्रावर उभी असलेली महालक्ष्मीची पूर्ती, विजय पांडुरंग (बालाजी)ची मूर्ती, राधाकृष्णाची मूर्ती, दोन गायी व वासरूंच्या मूर्तीचा समावेश आहे. २००४ मध्ये जीर्णाेद्धार करण्यात आला. ४५० वर्षांपूर्वीची विठ्ठल-रुख्माईची मूर्ती जीर्ण झाल्याने नवीन मूर्ती आणून बसविण्यात आली. त्यावेळच्या मूर्तींपैकी काही मूर्तीची रोज पूजा होते. नाथ महाराजांच्या मूर्तीच्या उजव्या हाताला या मूर्ती आहेत.
विठ्ठल रुख्मिणी मंदिर बनले ‘नाथ मंदिर’संत एकनाथ महाराजांनी फेब्रुवारी १५९९ मध्ये आपला देह ठेवला. तोपर्यंत औरंगपुऱ्यातील मंदिराचे नाव ‘विठ्ठल रुख्माई’ असे होते. त्यानंतर भक्तांनी या मंदिराचे नाव बदलून ‘नाथ मंदिर’ केले. १९६० मध्ये विश्वस्त मंडळ स्थापन झाले. २००४ मध्ये नाथ महाराजांच्या संगमरवरी मूर्तीची स्थापना करण्यात आली.