औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराने शुक्रवारी सर्वोत्कृष्ट शहर वाहतूक बस सेवेबद्दल राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. अर्बन मोबिलिटी या प्रकारात औरंगाबाद स्मार्ट सिटीने प्रथम क्रमांक मिळविला. सुरत दुसऱ्या तर अहमदाबादला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयातर्फे शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता आभासी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. स्मार्ट सिटी मिशनच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, सचिव दुर्गा शंकर मिश्रा, संचालक कुणालकुमार यांच्या उपस्थितीत पाच वेगवेगळ्या प्रवर्गात पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. आभासी बैठकीत औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे सहभागी झाले होते. औरंगाबाद स्मार्ट सिटीला ‘माझी स्मार्ट बस’साठी प्रथम पुरस्कार घोषित करण्यात आला. सुरत शहराला ‘डायनमिक शेड्यूलिंग ऑफ बस’साठी दुसरा तर अहमदाबाद शहराला 'ऑटोमेटेड पार्किंग सिस्टीम’साठी तृतीय पुरस्कार घोषित केला.
तीन वर्षांपासून सेवा
केंद्र शासनाने दिलेला निधी पडून असताना २०१८ मध्ये सार्वजनिक बस सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. जानेवारी २०१९ मध्ये सेनेचे तत्कालीन युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. १०० बसेस ३२ प्रमुख मार्गांवर नागरिकांना सेवा देत आहेत. आत्तापर्यंत ८७ लाख प्रवाशांनी बससेवेचा लाभ घेतला.
कोविडमध्ये बजावली महत्त्वाची भूमिका
मार्च २०२० मध्ये शहरात कोरोनाची पहिली लाट आलेली असताना स्मार्ट सिटी बसने अत्यंत मोलाची भूमिका बजावली. रुग्णांना ने-आण करणे. कोविड योद्ध्यांना ने-आण करण्याचे काम केले. मागील पंधरा महिन्यांत ४ लाख कि.मी. अंतर पूर्ण केले.
प्रवाशांसाठी नावीन्यपूर्ण योजना
नोव्हेंबर २०२० मध्ये बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. ई-तिकिटिंग, स्मार्ट कार्ड, मोबाइल ॲपसह अनेक नवीन आणि आकर्षक योजनांचा समावेश करण्यात आला. भविष्यात आणखी काही नावीन्यपूर्ण योजना बस सेवेशी निगडित सुरू करण्यात येणार आहेत.
स्मार्ट सिटीचे सांघिक यश
स्मार्ट सिटीच्या संपूर्ण टीमने मागील काही वर्षांमध्ये स्वत:ला झोकून देऊन काम केले. सांघिक प्रयत्नांमुळे हे यश संपादन करता आले. पुरस्काराचे श्रेय औरंगाबाद शहरातील नागरिकांनाही तेवढेच द्यायला हवे. माझी स्मार्ट बस म्हणून त्यांनी शहर बससेवेवर प्रेम केले. बससेवेचा लाभ घेतला. प्रवाशांनी स्मार्ट बसच्या डिजिटल सेवांचा लाभ घ्यावा.
आस्तिककुमार पाण्डेय, सीईओ, स्मार्ट सिटी.