लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राष्ट्रपिता असलेले महात्मा गांधी यांचा शहरातील शहागंजमध्ये छोटेखानी पूर्णाकृती पुतळा अनेक वर्षांपासून उभा आहे. त्या पुतळ्याच्या पाठीमागे झाडे तर चोहोबाजूंनी आॅटोरिक्षांनी परिसर वेढलेला असतो. त्यामुळे त्याठिकाणी पुतळा आहे की नाही, हेसुद्धा जाणा-या-येणा-यांच्या लक्षातही येत नाही. मात्र शहरात इतर महापुरुषांचे पुतळे भव्यदिव्य असून, त्यांच्या परिसराचे सुशोभीकरणही केलेले आहे. मात्र गांधीजींच्या पुतळ्याकडे सत्ताधा-यांसह विरोधकांचेही दुर्लक्ष असते, हे विशेष.२ आॅक्टोबर हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिन. या दिनानिमित्त शहागंज भागात असलेल्या गांधीजींच्या पुतळ्याचा परिसर महापालिकेकडून स्वच्छ करण्यात येतो. यावर्षी पुतळ्याभोवती असलेल्या लोखंडी जाळीला कलर देण्यात आला आहे.या पुतळ्याच्या पाठीमागची झाडे आणि समोरच्या बाजूला लावण्यात येणाºया रिक्षांमुळे गांधीजींचा पुतळा पूर्णपणे झाकून जातो. सहजासहजी दिसतसुद्धा नाही. या पुतळ्याचे सुशोभीकरण, भव्यदिव्य पुतळा बसविण्याची अपेक्षा गांधीप्रेमींची अनेक वर्षांपासून आहे. मात्र त्याकडे मनपाचे अधिकारी आणि पदाधिका-यांचे दुर्लक्ष आहे.२५ वर्षांपासून सत्तेमध्ये असलेल्या शिवसेना-भाजपला गांधी पुतळा आणि गांधी विचारांचे काहीही देणे-घेणे नाही. मात्र विरोधी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांनीही गांधी पुतळ्याचे सुशोभीकरण, भव्यदिव्य पुतळ्याशी काहीही देणे-घेणे नसल्याचा प्रत्यय अनेक वेळा आल्याचे दिसून येते.याच वेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी राजे, अहिल्याबाई होळकर आदी महापुरुषांचे भव्य पुतळे आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात आलेले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.
राष्ट्रपित्याचा पुतळा शहरात सर्वात लहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 11:53 PM