लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राष्ट्रीय महामार्ग क्र.१६१ चे रुंदीकरण करण्यासाठी भूसंपदानाची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे येत्या काही वर्षांत वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या हा महामार्ग खड्ड्यांनी इतका व्यापला की रोजच अपघात घडत आहेत. यात अनेकांचे बळी गेले अन् वाहतूक कोंडीचेही नवनवे विक्रम प्रस्थापित होत आहेत.दहा ते पंधरा दिवसांपूर्वी लागोपाठ पाच दिवस अपघातामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार घडले होते. त्यात एका अपघातात एकाचा बळीही गेला. मात्र मागील सहा महिन्यांत किमान दहा ते पंधरा जण कनेरगाव ते वारंगा रस्त्यावरील अपघातात दगावले आहेत. या रस्त्याला साईडपट्ट्या नाहीत अन् रस्ताही अरुंद आहे. साईड देताना जराही गल्लत झाली की, ट्रक थेट आडवाच होतो. त्यातही सोळा, अठरा व चोवीस टायरचे ट्रकही या मार्गावरून धावतात. त्यांची लांबी इतकी असते की, रस्ताच व्यापतो. त्यामुळे एका रात्री तब्बल चौदा तास वाहतूक खोळंबा सोसण्याची वेळ प्रवाशांवर आली होती. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने साईडपट्ट्यांची बाब मनावर घेतली नाही. दुरुस्ती अंदाजपत्रकात या साईडपट्ट्या होत्या, असे काहीजण सांगतात. मात्र राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी भ्रमणध्वनीवरही प्रतिसाद देत नसल्याने काहीच कळायला मार्ग नाही. काही ठिकाणी पूर्ण रस्ताच खड्ड्यांनी व्यापला. कळमनुरीकडे काही खड्डे दुरुस्त केले. मात्र उदयोन्मुख खड्ड्यांकडे कुणी ढुंकूनही पाहात नाही. कनेरगाव नाका -हिंगोली रस्ता तर दुर्लक्षितच झाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:52 AM